पौड : पौड-कोळवण मार्गावरील करमोळी पुलाच्या दोन्ही बाजूंना बसविण्यात आलेल्या लोखंडी सुरक्षा जाळ्यांचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उघड्यावर ठेवलेल्या जाळ्या चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पौड-कोळवण या प्रमुख मार्गावर आयोजित सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते. स्पर्धेसाठी रस्ता दुरुस्त करून बाजूच्या पट्ट्या, सूचना फलक आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले होते. मात्र स्पर्धा संपून अनेक दिवस उलटूनही काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करमोळी पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र पुलाजवळ झालेल्या वाहन अपघातानंतर रस्ता अपुरा पडत असल्याच्या कारणावरून या जाळ्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर जाळ्या पुन्हा बसविण्यासाठी आवश्यक रचनाही तयार करण्यात आली. मात्र संबंधित विभागाकडून अद्याप जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. सध्या या लोखंडी जाळ्या पुलाच्या एका बाजूला तसेच मुख्य रस्त्यालगत उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी जाळ्यांना बाजूने जोडणी करण्यात आली असली, तरी त्या रस्त्याच्या कडेला असल्याने चोरट्यांसाठी सहज उपलब्ध असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असून पुलावरील सुरक्षेच्या दृष्टीने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : Pune District : बायोमेट्रिक हजेरीला पशूवैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांचा विरोध