मालेगाव स्फोट सुनावणीला साध्वी प्रज्ञासिंह हजर

मुंबई – सततच्या अनुपस्थितीनंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह या आज मालेगाव स्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहिल्या. त्या आजच्या सुनावणीला अन्य चार सह आरोपींसमवेत आरोपीच्या पिंजऱ्यात उपस्थित होत्या.
प्रज्ञासिंह यांनी कोर्टाच्या इशाऱ्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने 19 डिसेंबर रोजी कोर्टाने त्यांना ही शेवटची संधी असल्याचे नमूद करीत त्यांना पुन्हा कोर्टात हजर राहण्याची सुचना केली होती. गेल्या महिन्यात त्या दोन वेळा कोर्टात उपस्थित न राहिल्याने न्यायाधिशांनी त्यांच्या संबंधात स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती.
या खटल्यातील सर्व सातही आरोपी सध्या जामीनावर बाहेर आहेत पण आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी उपस्थित राहिले पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. त्यानुसार आज प्रज्ञासिंह यांच्या समवेत लेप्टनंट कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, आणि सुधाकर चर्तुवेदी हे कोर्टात हजर राहिले.
आज एका साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली. पण त्याची उलट तपासणी मात्र पुर्ण होऊ शकली नाही. त्याची सुनावणी उद्यापर्यंत तहकुब करण्यात आली. या खटल्यात एनआएने एकूण 400 साक्षीदार नोंदवले असून त्यातील 140 साक्षीदारच आत्तापर्यंत तपासण्यात आले आहेत.
मालेगावातील एका मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या स्फोटात सहा जण ठार तर शंभरावर लोक जखमी झाले आहेत. यातील प्रज्ञासिंह, पुरोहित आणि अन्य आरोपींवर ऑक्टोबर 2018 मध्ये आरोपपत्र ठेवण्यात आले आहे.





