मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. राज्य सरकारकडून सात अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती. त्यामध्ये सदानंद दाते यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. सदानंद दाते सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक आहेत. सदानंद दाते हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा महासंचालकपदी कार्यरत आहेत. त्याआधी ते राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख तथा डीजीपी होते. नवनिर्मित मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणूनही दाते यांनी काम पाहिलेले आहे. 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यावेळी दाते यांना दहशवाद्यांनी झाडलेल्या गोळ्या लागल्या होत्या. मात्र त्यांनी काही पोलिसांसह दहशतवाद्यांचा सामना केला. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने गौरविण्यात आले होते. प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून अधिकारी सदानंद दाते यांची ओळख आहे. सदानंद दाते यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलीस, नवी मुंबई पोलीस अधीक्षक या पदांवर काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वात ब्लॅक कॅट कमांडोंनी अनेक ऑपरेशन्स यशस्वी पूर्ण केले आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला फाशी देण्यासाठी अर्थररोड तुरुंगातून पुण्यातील येरवडा तुरुंगात घेऊन जाण्याची महत्त्वाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वी पूर्ण केली आहे. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1966 रोजीचा आहे. त्यांची डीजीपीपदी नियुक्ती झाल्यास 1991 च्या बॅचचे अधिकारी दाते यांच्यासाठी ती वाढदिवसाची भेट मानली जात आहे. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2026 पर्यंत असेल.