दु:खद ! रोहित सरदाना पाठोपाठ दूरदर्शनच्या अँकर कनुप्रिया यांचं करोनानं निधन

नवी दिल्ली – देशभरात करोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाने दुसऱ्या लाटेत अनेक लोकप्रिय व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं आहे. प्रख्यात पत्रकार, हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे शुक्रवारी निधन झालं. त्यांच्या निधनाचे वृत्त ताजे असतानाच आता दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचं देखील उपचारादरम्यान करोनाने निधन झालं आहे.
कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर होत्याच, त्या अभिनेत्रीही होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. सोबतच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेवल बरीच कमी झाली होती. तसेच तापही वाढत होता. याच दरम्यान कनुप्रिया यांचं निधन झालं.
एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी आजतकचे अँकर रोहित सरदाना यांचं देखील करोनाने निधन झालं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. आज कनुप्रिया यांना देखील करोनाने हिरावलं आहे. पत्रकारिता क्षेत्राला दोन दिवसांत दोन धक्के बसले आहे.


