सचिन वाझे यांचा तुरुंगात छळ; परमवीर सिंह यांचा पुन्हा गंभीर आरोप

मुंबई – सचिन वाझेने ईडीला जो जबाब दिला आहे तो जबाब मागे घ्यावा यासाठी अनिल देशमुखांनी त्याच्यावर दबाव टाकला जात आहे. विशेष म्हणजे याच दबावातून तुरुंगात सचिन वाझेला शिवीगाळ केली जात त्यांचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे.
सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता असा जबाब परमवीर सिंह यांनी काल ईडीला दिला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे.
परमवीर सिंह यांनी ईडीला दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद केले की, चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा म्हणून देशमुख यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. शिवाय या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा झाली होती, असा आरोपही त्यांनी केला.
परमवीर सिंह यांनी दिलेल्या जबाबानुसार अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात 30 नोव्हेंबर 2021 रोजी चांदीवाल आयोगाच्या सुनावणीवेळी भेट झाली होती. ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी पाटील यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव आणला होता. याबरोबरच उपायुक्त पाटील आणि वाझे यांच्यामध्ये चांदीवाल आयोगासंदर्भात एक गुप्त बैठकही झाली होती, असे त्यांनी जबाबात नमूद केले आहे.



