सचिन वाझेला माफीचा साक्षीदार होण्यास परवानगी; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार

मुंबई- बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी माफीचा साक्षीदार होणार आहेत. याबाबत सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वाझे सध्या याच शंभर कोटीच्या प्रकरणात कोठडीत आहेत. माफीचा साक्षीदार बनवले जाण्याच्या संदर्भात त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. संबंधित अर्जाला आता न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
वाझेंना माफीचा साक्षीदार बनवण्यास देशमुखांच्या वकिलाकडून विरोध करण्यात आला होता. तथापी, एक आरोपी दुसऱ्या आरोपीच्या माफीचा साक्षीदार होण्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. या सुनावणी दरम्यान सचिन वाझे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.



