प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे. एकदिलाने, एकमताने काम करावे. शिवसेनेने केलेली कामे, प्रश्नांची केलेली सोडवणूक तळागाळातील मतदारापंर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, अशा सूचना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना शनिवारी (दि. १५) केल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ताथवडे येथील कासा दी सिल्व्हर हाॅटेलमध्ये आढावा बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना अहिर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, जिल्हा प्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख संजाेग वाघेरे, माजी शहर प्रमुख सचिन भाेसले, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, पुनम पोतले, शहर संघटिका रूपाली आल्हाट, जिल्हा समन्वयक सुशिला पवार, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी, आढावा, संघटनात्मक बांधणी कशी सुरू आहे, याची संपर्क प्रमुख अहिर यांनी माहिती घेतली. तसेच सर्व प्रभागात उमेदवार तयार ठेवा. एकदिलाने काम करा. शिवसेनेने केलेली कामे, प्रश्नांची केलेली सोडवणूक तळागाळातील मतदारापंर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहनही अहिर यांनी केले.