आपले शेजारी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कोणी चांगले आहेत किंवा असे आहेत की ज्यांच्यामुळे आपले कोणते नुकसान होणार नाही. अशा शेजार्यांना मदत करण्याचा भारताचा स्वभाव आहे. ‘शेजारी खरेच चांगला आहे याची आम्हाला खात्री झाली तर आम्ही तेथे गुंतवणूकही करतो. त्यांना मदत करतो, त्यांच्याशी सहकार्य वाढवतो’, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. श्रीलंकेचा त्यांनी उल्लेख केला. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला मदत करताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अगदीच आस्ते कदम सुरू असताना भारताने त्या देशाला अगदी तत्परतेने मदत केली. याची श्रीलंकेनेही जाण ठेवली आणि त्याचे प्रतिबिंब उभय देशांच्या संबंधांत स्पष्टपणे दिसते. पाकिस्तानकडून समंजस वागणुकीची अपेक्षा नाही. दहशतवादाचा कारखाना जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत त्या देशाशी संबंध सुरळीत होणे शक्य नाही. बांगलादेशच्या संदर्भात मात्र स्थिती हाताबाहेर जाण्याच्या आतच हालचाल करत भविष्यातील अडचणी आटोक्यात ठेवण्याचा किंवा संयमित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जयशंकर यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने बांगलादेशला दिलेली भेट आणि त्यावेळी खालिदा यांचे पुत्र आणि राजकीय उत्तराधिकारी तारिक रहमान यांची घेतलेली भेट हे भारताचे योग्य पाऊल आहे. ही भेट केवळ शोकसंदेश देण्यासाठी झालेली नाही, तर भारत बांगलादेशशी व विशेषत: तारिक रहमान यांच्या बीएनपी या पक्षाशी आपले संबंध वेगळ्या पद्धतीने पुन्हा मांडू इच्छितो हा संदेश त्यातून दिला गेला. बांगलादेशात येत्या 12 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. तेथील जनमत सध्या तारिक रहमान यांच्या बीएनपी या पक्षाला अनुकूल आहे. बांगलादेशचे नवे पंतप्रधान तेच असतील असा स्पष्ट कौल तेथील जनता देईल अशी स्थिती आहे. बीएनपी पक्षाचा कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आवामी लिग पक्षाच्या नेत्या शेख हसीना यांना देशातून पळ काढावा लागला आहे. त्या भारतातच वास्तव्याला आहे. त्यांच्या पक्षाला निवडणूक लढण्यास मनाई असल्याने तारिक यांना कोणाचे आव्हान नाही. हसीना यांच्या पक्षाशी भारताचे कायमच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. याउलट बीएनपी संदर्भात भारत कायमच सावध राहिला आहे. हसीना यांच्या राजवटीत बांगलादेशात काय घडले आणि त्यांच्यावर काय आरोप आहेत हा त्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. दुर्दैवाने तेथील विद्यमान काळजीवाहू राजवटीने आणि त्यांच्यावर असलेल्या जिहादी गटांच्या दबावाने हसीनांप्रती असलेल्या भारताच्या सहानुभूतीलाच राजकीय मुद्दा बनवला आहे. त्याचा वापर करून भारतविरोधी वातावरण तयार करण्यात आले आहे. बांगलादेशातील जी विद्यमान पर्यायी व्यवस्था आहे त्याच्या स्थापनेत देशातला सगळ्यांत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून बीएनपीचाही हातभार आहे; पण या पक्षाने कट्टरवाद्यांच्या कच्छपी लागू नये यासाठीही तारिक रहमान यांच्याशी भारताने सुरू केलेला औपचारिक व्यवहार महत्त्वाचा ठरतो. बीएनपीचे पूर्वीपासून कट्टरवाद्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. भारताने त्यामुळेच या पक्षाप्रती फारसे ममत्व दाखवले नव्हते. विविध आर्थिक गुन्ह्यांमध्ये अटकेच्या आणि शिक्षेच्या भीतीने तारिक रहमान यांना देश सोडावा लागला होता. सतरा वर्षांनंतर ते बांगलादेशात परतले आहेत. दरम्यानच्या काळात बरेच बदल जगात आणि त्यांच्या देशातही झाले आहेत. याची तारिक यांनी निश्चितच नोंद घेतली असणार. त्यामुळेच त्यांनी ‘बांगलादेश फर्स्ट’चा नारा दिला आहे. त्यांनी सगळ्यांना सोबत नेण्याचे म्हटले आहे आणि कट्टरवाद्यांना हायसे वाटावे किंवा त्यांनी उन्माद करावा असे कोणतेही विधान अद्याप केलेले नाही. थोडक्यात तारिक रहमान यांनी मध्यममार्गानेच ते जातील, कोणत्या एका बाजूला झुकणार नाहीत असे स्पष्ट केले असल्यामुळे भारतासाठी ही सकारात्मक बाब आहे. बांगलादेश हा पूर्वी पाकिस्तानचा भाग होता आणि पाकिस्तान भारताचा भाग होता. पाकिस्तानच्या दडपशाहीतून भारतानेच बांगलादेशची मुक्तता केली आहे. तथापि, हा इतिहास ज्यांना माहिती आहे किंवा त्यावेळी जे पोळले गेले होते ती पिढी आता संपली आहे. बांगलादेशच्या नव्या पिढीला त्याची दाहकता तेवढी समजणार नाही हे स्वाभाविक आहे. शेख हसीना आणि खालिदा झिया यांना ती समजत होती. तारिक यांना ती समजेलच याची शाश्वती नाही. त्यांनी पुन्हा बांगलादेशला कट्टरवाद्यांच्या दावणीला बांधले तर ते अंतिमत: भारताला तापदायकच होणार आहे. तारिक यांनी स्थैर्य आणि शांततेचा मार्ग निवडावा यासाठी भारताला त्यांच्याशी व्यवहार करावाच लागेल. जयशंकर म्हणतात त्याप्रमाणे शेजार्याकडून उपद्रव होत नसेल तर भारताचा मदतीचा स्वभाव राहिला आहे. करोनाच्या काळातही पाश्चात्य देश त्यांच्याकडे लसींची मुबलक उपलब्धता असतानाही जगापासून फटकून वागले. याउलट भारताने आपल्या दीडशे कोटी जनतेची गरज पूर्ण करून जगातील गरीब आणि शेजारी देशांनाही मदत केली. बांगलादेशच्या लोकांना आज चिथावणी दिली गेली असल्यामुळे भारताच्या मदतीची किंवा भविष्यात होणार्या लाभाची त्यांना जाणीव नाही. एखाद्या देशात जेव्हा भावनांचे राजकारण करून लोकांची माथी भडकवली गेली असतात आणि उन्माद निर्माण केला गेला असतो तेव्हा तेथे शांतता परत यायला काही काळ जावा लागतो. जेव्हा शांतता येते तेव्हाच लोक भल्याबुर्याचा विचार करतात. तारिक रहमान यांनी त्यांना तो बदल करावासा वाटतोय असे सूचित केले आहे. भारताने त्यांच्याशी औपचारिक संवाद साधण्यातून हेच सूचित केले आहे की आम्ही तुम्हाला आजचा बांगलादेशचा अधिकृत नेता मानतो आणि त्यावर पुढच्या महिन्यात बांगलादेशच्या जनतेनेही शिक्कामोर्तब केले तर भविष्यातील चर्चांसाठी वातावरण पोषक आणि सौहार्दपूर्ण असेल.