जेरुसलेम : इस्रायलबरोबर द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर दोन दिवसांसाठी इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रस्तावित भारत भेटीची पूर्वतयारी म्हणून जयशंकर यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच फोनवर चर्चा केली, त्यानंतर दोघेही लवकरच भेटणार आहेत, असे नेतान्याहू यांनी म्हटले होते. या दौऱ्यादरम्यान जयशंकर इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग, पंतप्रधान नेतन्याहू आणि परराष्ट्र मंत्री गिडियन सा’अर यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होईल, असे येथील सूत्रांनी सांगितले. तेल अविव येथे आल्यानंतर जयशंकर उच्चस्तरिय सर बानी यास फोरममध्ये सहभागी झाले. भारत-युएइ संयुक्त आयोगाची १६ वी बैठक आणि भारत युएइ धोरणात्मक संवादाच्या पाचव्या फेरीमध्येही ते सहभागी झाले. भारत आणि इस्रायलमधील उच्चस्तरिय अनेक बंठकांनंतर नेतान्याहू यांचा बहुचर्चित भारत दौरा निश्चित केला जाणार आहे. दोन्ही देश मुक्त व्यापार कराराच्या दिशेने प्रगती करत आहेत. या प्रक्रियेचा पाठपुरावा करण्यासाठी इस्रायलचे पर्यटन मंत्री हैम काट्झ, अर्थ आणि उद्योग मंत्री नीर बरकत, कृषी आणि अन्न सुरक्षा मंत्री अवी डिच्टर आणि अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारताला भेट दिली होती.