समिरण नागवडे श्रीगोंदा -राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप यांना “रयत’च्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी संधी देत संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी मोठे “बळ’ दिले आहे. त्यातून जगताप हेच विधानसभेचे उमेदवार असण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, शरद पवार यांचे भाकरी फिरविण्याचे विधान श्रीगोंद्यात “रयत’च्या निवडीला लागू झाले आहे. राहुल जगताप हे यापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य होते. आता त्यांना व्यवस्थापन परिषदेवर बढती मिळाली आहे. व्यवस्थापन परिषद ही “रयत’मधील सर्वोच्च परिषद मानली जाते. मागील विधानसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याने जगताप यांची राजकीय पीछेहाट होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत राहुल जगताप यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली. त्यामध्ये जगताप यांनी जिल्हा बॅंक आणि कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून आपले वर्चस्व सिध्द केले.वर्षानुवर्षे नागवडे गटाच्या ताब्यात राहिलेल्या छत्रपती शिवाजी खरेदी-विक्री संघाची सत्ता हस्तगत केली. तर नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत देखील त्यांनी बहुमत मिळवले. कुकडी कारखान्यासमोरील आर्थिक अडचणी ही जगतापांची एकमेव उणी बाजू आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवून देत राहुल जगताप यांनी विधानसभेची दावेदारी अधिक भक्कम केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्या “रयत’वरील निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जगताप हेच राष्ट्रवादीचे विधानसभेचे उमेदवार असण्याचे संकेत यानिमित्ताने देण्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जगताप यांना कुकडी कारखाना आणि जिल्हा बॅंकेनंतर आता रयत शिक्षण संस्थेच्या कारभाराची संधी मिळाली आहे. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजकीय फायदा जगताप यांना होणार आहे. दरम्यान, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांना रयतच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्यत्व गमवावे लागले. छत्रपती शिवाजी खरेदी-विक्री संघ आणि बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपासून फारकत घेत कॉंग्रेसशी साधलेल्या जवळीकीचे भांडवल करीत भोस यांना “रयत’वरून हटविण्यासाठी “फिल्डिंग’ लावण्यात आली होती. त्याचबरोबर भोस यांचे सुपुत्र गणेश भोस यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचे आयते कोलीतही भोस विरोधकांच्या हाती लागल्याने भोस यांना हटविण्यात त्यांच्या विरोधकांना यश आले. त्यामुळे खा. शरद पवार यांचे भाकरी फिरविण्याचे विधान श्रीगोंद्यात “रयत’च्या निवडीच्या निमित्ताने लागू झाले. खा.शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आशीर्वादामुळे “रयत’च्या व्यवस्थापन परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. संस्थेतील विद्यार्थी आणि सेवकांसाठी निस्वार्थ भावनेने काम करू. राहुल जगताप, माजी आमदार