#AsianGames : देशासाठी सुवर्ण जिंकायचेय – ऋतुराज गायकवाड

नवी दिल्ली :- “आगामी आशियाई स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रगीत गाण्यासाठी व्यासपीठावर उभे राहण्याचे आपले स्वप्न आहे,’ अशी प्रतिक्रिया यंदाच्या आशियाई स्पर्धेसाठीचा भारतीय संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओत व्यक्त केली आहे.
5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होत असल्यामुळे बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आशियाई स्पर्धा 2023 साठीच्या क्रिकेट स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांची घोषणा केली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत 15 सदस्यीय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व पुण्याचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड करणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असला तरी भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
कर्णधार झाल्यानंतर ऋतुराज पुढे म्हणाला की, माझ्यावर ही जबाबदारी दिल्याबद्दल मी बीसीसीआय, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचे आभार मानू इच्छितो. भारतासाठी खेळणे ही नेहमीच अभिमानाची गोष्ट आहे आणि या मोठ्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल.
भारतीय संघ :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).





