#RussiaUkraineWar : युक्रेनमधील शाळा पुन्हा सुरू; मात्र मुलांच्या….

मायाखायलो-कोत्सुबान्के (युक्रेन) – युक्रेनमधील शाळा आजपासून पुन्हा (Schools reopen in Ukraine) सुरू झाल्या. मात्र या शाळांमध्ये सुट्टीनंतर दाखल होणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसू शकला नाही. युक्रेनच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार शाळांचा शेवटचा दिवस 24 फेब्रुवारीला होता. त्यानंतर लगेचच रशियाने युक्रेनवर ( #RussiaUkraineWar ) हल्ला केल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली होती. रशियाने युक्रेनच्या शहरी भागांवर केलेल्या माऱ्यामध्ये आतापर्यंत 379 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 233 मुले बेपत्ता झाली आहेत, असे युक्रेनच्या सरकारी न्यायाधिकरणाच्या कार्यालयाने म्हटले आहे.
याशिवाय 7,013 मुलांना बळजबरीने रशियाचे नियंत्रण असलेल्या भागामध्ये हलवण्यात आले आहे. रशियाच्या फौजांकडून सातत्याने होत असलेल्या बॉम्बवर्षावामुळे काही मुलांना आपले रहाते गाव सोडून परागंदा व्हावे लागले आहे. तर काही मुलांना अनेक आठवडे भूमिगत कंपार्टमेंटमध्ये काढावे लागले होते.
युक्रेनमधील ज्या भागांमध्ये अद्याप युद्धाचे चटके बसलेले नाहीत, तेथील मुलांना ऑनलाइन अभ्यास करावा लागला आहे. मात्र त्यांनाही हवाई हल्ल्यांचे इशारे देणाऱ्या सायरनचा सातत्याचा अडथळाही होत असतो. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमधील 2,400 शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर 269 शाळा पूर्णपणे जमिनदोस्त झाल्या आहेत. काही शाळांमध्ये आश्रय छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र युद्धाच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये रशियाने अशा काही आश्रय छावण्यांवरच बॉम्बफेक केली होती.
युक्रेनमधील शाळा जरी सुरू होत असल्या तरी ज्या शाळांमध्ये मुले येणे अपेक्षित होते, तेथे आता बॉम्ब आणि बंदुकांच्या खुणा शिल्लक आहेत. एकूण विद्यार्थी संख्येपैकी जेमतेम काही मुले शाळेत दाखल झाली आहेत. मुलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न आता शिल्लक राहिला आहे.





