मोठी बातमी : रशियाने पुकारले युक्रेनविरुद्ध युद्ध; राजधानी कीवसह अनेक ठिकाणी स्फोट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि परत जावे, असे पुतीन यांनी धमकी दिली आहे. आमचा यूक्रेनवर कब्जा करण्याचा मानस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. तसेच पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क शहरात आज पहाटे किमान पाच स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जात आहे. पुतीन यांनी अमेरिका आणि नाटो यांना उघडपणे धमकी दिली आहे की त्यांनी हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्यांना इतिहासातील सर्वात वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल.
रशियाने युद्धाच्या बुधवारी दिशेने आणखी एक पाऊल टाकताना युक्रेनच्या सीमेवर आपल्या सैनिकांसाठी 550 वर तंबू ठोकले होते आणि तात्पुरते हॉस्पिटल, हेलिपॅड उभारले होते. त्याचबरोबर राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी एक व्हिडीओ जारी करीत आम्ही चर्चेस तयार आहोत पण देशहितासाठी तडजोड करणार नाही अशी भूमिकाही काल जाहीर केली होती. मंगळवारी प्रसारीत केलेल्या छायाचित्रानुसार युक्रेन सीमेपासून अवघ्या 20 कि.मी. अंतरावर रशियन लष्कराने 550 तंबू उभारल्याचे स्पष्ट होत आहे. युक्रेनच्या पूर्वभागातील डॉनेत्सक आणि लुहान्सक या दोन प्रांतात रशियन सैनिक मोठय़ा प्रमाणावर तैनात असून, रणगाडे रस्त्यावर फिरत आहेत.





