चाळीस वर्षांनंतरही अर्थ लावण्यात अपयश
मॉस्को : गेल्या चार दशकांपासून रशियामधल्या रेडिओ सिग्नलबाबत गूढ वाढलं आहे. तिथे एक गूढ रेडिओ सिग्नल प्रसारित केला जात आहे. १९८२ पासून जाणवत असलेल्या या सिग्नलचा अर्थ आजही कोणाला समजलेला नाही.
या रेडिओ सिग्नलबाबत अनेक सिद्धांत उदयास आले आहेत. काही लोकांच्या मते, हे सिग्नल इंटेलिजन्स एजंटसाठी आहेत. काही जणांनी असा दावा केला आहे, की या सिग्नल्सच्या मदतीने रशियन शास्त्रज्ञ एलियन्सशी संवाद साधतात; पण हे सिग्नल नेमके कुठून येतात आणि त्यांचा उद्देश काय आहे, हे अद्याप कोणालाच माहीत नाही, या संदर्भात तिसरा सिद्धांत रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाशी संबंधित आहे.
1970 च्या दशकात या सिग्नलमधून बीप आणि बझरसारखे आवाज यायचे; मात्र हा सिग्नल कोण कोणाला पाठवत होतं, हे कोणालाच माहीत नाही. अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की शीतयुद्धाच्या काळात याची सुरुवात झाली आहे. या रेडिओ सिग्नलमध्ये अगोदर बीपचा आवाज आला आणि नंतर बझर वाजू लागला. 1990च्या दशकात हा रेडिओ सिग्नल रशियन लष्कराच्या पोवारोवो तळावरून प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे; पण 2010 मध्ये तो पूर्णपणे शांत झाला.
2010मध्ये या सिग्नलचं स्थान बदललं, त्यामुळे त्याला ट्रॅक करणं जवळजवळ अशक्य झालं. 2000मध्ये जेव्हा काही तज्ज्ञांनी पोवारोवो साइटला भेट दिली तेव्हा तिथे एका गार्ड डॉगव्यतिरिक्त काहीही आढळलं नाही. तिथे एक एंट्री बुकदेखील होतं. त्यावरून ते ठिकाण तज्ज्ञ येण्याच्या 90 मिनिटांपूर्वी रिकामं केल्याचं उघड झालं. हा रेडिओ सिग्नल अजूनही रशियातल्या लोकांसाठी एक रहस्य आहे. अनेकांनी त्याचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तज्ज्ञ डेव्हिड स्टेपल्स यांचं असं म्हणणं आहे, की हे सिग्नल रशियन सरकारकडून पाठवले जात होते. ते म्हणाले, की रशियन सरकारने खरोखरच हे सिग्नल पाठवले असतील तर साहजिक त्यामागचा हेतू शांततापूर्ण नसेल. हे सिग्नल युद्धादरम्यान वापरले जाण्याची शक्यता आहे.