रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला असून रशियन फौजा युक्रेनमध्ये विध्वंस माजवत आहेत. मात्र काही रशियन नागरिकांनीच युक्रेनवरील हल्ल्याची निंदा केली असून युद्धाच्या सावटाखाली अडकलेल्या युक्रेनियन नागरिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता रशियाच्या अंतराळवीरांनी देखील युक्रेनला समर्थन करणारी कृती केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रशियन अंतराळवीर सामान्यतः निळ्या रंगाचा सूट परिधान करतात. मात्र यावेळी डेनिस मॅटवेयेव, ओलेग आर्टेमेव्ह आणि सेर्गेई कोर्साकोव्ह हे रशियाचे तीन अंतराळवीर जेव्हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचले तेव्हा त्यांनी पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. रशियन अंतराळवीरांची ही कृती रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध असल्याचं बोललं जातंय.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हा प्रकल्प रशिया, अमेरिका, कॅनडा, जपान आणि अन्य काही युरोपीय देशांनी एकत्र येत सुरु केला आहे. अमेरिका व रशिया या दोन महासत्तांदरम्यान वारंवार तणावाचे वातावरण निर्माण होत असले तरी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हा प्रकल्प गेल्या दोन दशकांपासून सुरु आहे.
रशियाच्या अंतराळवीरांनी कझाकस्तान येथील रशियन मालकीच्या प्रक्षेपण केंद्रावरून उड्डाण केले होते. ते तीन तासांनंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचले. तेथे त्यांचं अमेरिकन, रशियन आणि जर्मन अंतराळवीरांनी स्वागत केलं.