मद्रिद – रशियाचे एक मालवाहू जहाज स्पेन आणि अल्जेरिया दरम्यान भूमध्य समुद्रात बुडाले आहे. या दुर्घटनेनंतर जहाजावरील दोन कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. स्पेनच्या सागरी सुरक्षा दलाकडून या बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जातो आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. उर्सा मेजर असे बुडालेल्या मालवाहू जहाजाचे नाव आहे. या जहाजावर एकूण १४ कर्मचारी होते. त्यांना वाचवण्यातयश आले असून स्पेनच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. जहाजाच्या इंजिन रूममध्ये स्फोट झाल्यानंतर हे जहाज बुडायला लागले होते, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या जहाजाच्या दुर्घटनेबद्दल आपल्याला समजल्याचे स्पेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्फोट झाला तेंव्हा हे जहाज स्पेनच्या दक्षिणेकडील अल्मारा किनाऱ्यापासून ५७ सागरी मैलांवर होते. स्पेनच्या अधिकाऱ्यांनी जहाजाशी संपर्क साधला आणि मदतीसाठी जवळच असलेल्या अन्य जहाजाला निरोप दिला. या भागात हवामान अत्यंत खराब होते. वाचवलेले कर्मचारी कार्टाजेना शहरात नेण्यात आले असून ते जखमी झाले नाहीत, असे स्पेनच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. हे जहाज का बुडाले याचा शोध घेतला जात असल्याचे स्पेनमधील रशियाच्या दूतावासाने म्हटले आहे. मात्रस्पेनच्या अधिकाऱ्यांनी जहाज बुडण्याचे कोणतेही कारण सांगितले नाही.