मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीनंतर रशियन सैन्यात अडकलेल्या 45 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 45 भारतीयांना रशियन सैन्यातून मुक्त करण्यात आले असून सुमारे 50 जणांना लवकरच परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीडियाला माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, “जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर 45 भारतीयांना दिलासा मिळाला आहे आणि त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटे 45 भारतीय देशात परतले आहेत. रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीयांचा मुद्दा भारत-रशिया संबंधांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. पीएम मोदींनी जुलैमध्ये रशियाच्या दौऱ्यावर असताना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी मॉस्कोमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान रशियन सैन्यात सेवा देणाऱ्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर सुटका करण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना हे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रशियाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नेमंक प्रकरण काय…? रशिया युक्रेन युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसला असून त्याचा काही प्रमाणात फटका भारतीयांनाही बसला आहे. याचा फायदा घेत काही स्थानिक एजंटांनी भारतीय तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून रशियाला नेले होते. रशियात पोहोचताच त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यांना युद्ध प्रशिक्षण घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर त्यांना रशियन सैन्यात भरती करण्यात आले, जिथे ते युक्रेनशी युद्ध लढत होते. त्यानंतर अनेक भारतीय तरुणांनी त्यांचे व्हिडीओ शेअर करून त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर हा मुद्दा पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचला. त्यानंतर या भारतीयांना सोडवण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या. Pakistan : पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाइल मोहिमेला जबर धक्का; अमेरिकेनं मोठा निर्णय घेत केली ‘ही’ कारवाई.. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सहा भारतीय दोन दिवसांपूर्वी परतले आहेत आणि अनेक जण लवकरच मायदेशी परततील. अजूनही 50 हून अधिक भारतीय नागरिक रशियन सैन्यात सेवा देत आहेत, ज्यांना आम्ही शक्य तितके परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत.