रशिया -अमेरिका तणाव! बायडेन यांच्या निर्णयामुळे पुतीन भडकले, अण्वस्त्रांद्वारे हल्ल्याचा दिला इशारा

मॉस्को – आता रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच जो बायडेन यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी युक्रेनला रशियाविरुद्ध अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. युक्रेनने या क्षेपणास्त्रांचा वापर केल्यास ते रशियातील मोठ्या शहरांना लक्ष्य करू शकतील.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ताज्या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मंगळवारी नवीन आण्विक सिद्धांताला मंजुरी दिली. याअंतर्गत रशियावर अण्वस्त्रधारी देशाकडून क्षेपणास्त्राने हल्ला झाल्यास पुतिन अण्वस्त्रांच्या वापराचा विचार करू शकतात.
बयडेन यांच्या संमतीला प्रतिसाद म्हणून रशियाने आपला अण्वस्त्र सिद्धांत बदलला आहे. आण्विक तत्त्वांनुसार, पारंपरिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर विमानांचा वापर करून रशियावर केलेले हल्लेही अण्वस्त्र वापरण्याच्या निकषात येतात.
त्यात असेही म्हटले आहे की, कोणत्याही आघाडीच्या देशाने रशियावर हल्ला केला तर तो संपूर्ण आघाडीवर हल्ला होईल. नाटोला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ही तरतूद तयार केल्याचे मानले जात आहे. 1962 च्या क्यूबन क्षेपणास्त्र संकटानंतर रशिया आणि पश्चिमेकडचे देश यांच्यातील सर्वात मोठा संघर्ष युक्रेन युद्धामुळे झाला आहे.





