पोत्राव्हस्क, (रशिया) – युक्रेनविरोधातील युद्धाच्या मुद्यावरून युक्रेनची पाठराखण करणाऱ्या पोलंड आणि बल्गेरिया या दोन देशांचा गॅस पुरवठा आज रशियाने तोडला. त्यामुळे आता रशिया-युक्रेन वादामध्ये थेट तिसऱ्या देशांना ओढले गेले आहे.
रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला अधिक शस्त्रे आणि दारुगोळा देण्याची ग्वाही दिल्यानंतर लगेचच रशियाने युरोपात निर्यात केल्या जाणाऱ्या गॅसचे दर वाढवले आहेत. तर पोलंड आणि बल्गेरियाला होणारा गॅस पुरवठा तोडण्यात आल्याचे रशियाची सरकारी गॅस पुरवठा कंपनी गॅझप्रोमने म्हटले आहे. या देशांनी रशियाला रुबलमध्ये गॅसची किंमत देण्यास नकार दिला.
तसेच या महिन्याच्या प्रारंभापासून या देशांकडून कोणतेही पेमेंट मिळाले नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. रशियाची ही कृती युरोपीय संघाच्या देशांना “ब्लॅकमेल’ करण्याचा प्रकार आहे. ही कृती असमर्थनीय आणि अमान्य असल्याची टीका युरोपीय संघ आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्होन डेर लेयेन यांनी केली आहे. तर पॅरिसमधील “इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’नेही रशियाची ही कृती म्हणजे सध्याच्या करारांचा भंग असल्याची टीका केली आहे.
पोलंड रशियाचा पहिल्यापासूनचा विरोधक आहे. तेथूनच युक्रेनला मोठा शस्त्रसाठा पुरवला जात आहे. बल्गेरियाला रशियाकडून 90 टक्के गॅस पुवठा होता. दोन्ही देशांनी पुतीन यांच्या म्हणण्यानुसार गॅसची किंमत रुबलमध्ये देण्यास नकार दिला आहे.
रशियाचे हल्ले अधिकच वाढले
युक्रेनच्या ट्रान्स दनत्सेस्टर भागात शेजारच्या मोल्दोव्हातून आता रशियाने हल्ले वाढवले आहेत. युक्रेनचे ओडेसा बंदर आणि शेजारच्या रोमानियाला जोडणाऱ्या रेल्वेमार्गावरही रशियाने क्षेपणास्त्रे डागली आहेत. तर सीमेजवळच्या बेलगोर्ड येथील रशियाच्या दारुगोळ्याच्या साठ्याला आग लागल्याचेही वृत्त आहे.