अहमदनगर – राहाता, शिर्डी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी

राहाता – दिवाळीच्या सणानिमित्त कपडे, किराणा, दिवाळी फराळ, लक्ष्मीपूजनसाठी विविध साहित्य फटाके,आकाश कंदील व विद्युत रोषणाई करण्यासाठी गुरुवारी शिर्डी व राहाता शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण समजला जातो. सर्वसामान्य ते श्रीमंत प्रत्येक व्यक्ती हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो. महिलांची घरातील साफसफाई करण्यासाठी दिवाळीपूर्वी १५ दिवस आदीपासूनच लगबग सुरू होताना दिसते. पुरुष मंडळींच्या खांद्यावर घराची जबाबदारी असल्याने घरातील व्यक्तींचे कपडे खरेदी व किराणा हि मुख्य जबाबदारी त्यांना पार पाडायची असल्याने दिवाळी सणाच्या एक महिन्यापासूनच पैशाची जमवाजमवी करण्याचे काम प्रत्येक जण करत असल्याचे बघायला मिळते.
शुक्रवारी १ नोव्हेंबरला दिवाळी असल्याने मंगळवारपासूनच राहाता व शिर्डी शहरात दीपावली सणानिमित्त पणत्या, आकाश कंदील, लक्ष्मीपूजन करण्यासाठी नविन वही ,पेन, कुलदेवी फोटो, लक्ष्मीनारायण फोटो, केरसुणी, झेंडू व शेवंती फुले , दुकानात बनवलेले दिवाळीचे फराळ, नवीन कपडे, फळे व फटाके खरेदी करण्यासाठी नागरिकांनी विविध दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
यावर्षी राज्य व केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन तसेच इतर पिकांचे पिक विमा, गणेश व प्रवरा कारखान्याने ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केलेली बाकी, सोयाबीनचे यावर्षी मिळालेले चांगले उत्पादन व दूध तसेच विविध सोसायटीच्या सभासदांना मिळालेले रेबिट व लाभांश , लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना बँक खात्यात मिळालेले पैसे यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी वर्गाकडे दिवाळीपूर्वी पैसा उपलब्ध झाल्याने यावर्षी सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी उत्साहात साजरी होताना दिसत आहे.
दिवाळी शुक्रवारी असल्यामुळे महिला वर्ग दिवाळीचे फराळ करण्यासाठी व्यस्त असताना दिसत आहे. शहरातील फराळ बनवणारे हलवाई तसेच आचारी यांच्याकडे दिवाळी फराळ बनवण्यासाठी व दिवाळीनिमित्त फटाके खरेदी करण्यासाठी फटके स्टॉलवर नागरिकांची गर्दी होताना दिसली. यावर्षी शहरातील छोट्या-मोठ्या दुकानात नागरिकांची विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसून आला.
नागरिकांनी आपापल्या घरावर व व्यापारी वर्गाने दुकानावर विविध प्रकारचे आकाश कंदील तसेच विद्युत रोषणाई केली आहे. शुक्रवारी दिवाळी असल्यामुळे गुरुवारी फुल शेती करणाऱ्या फुल उत्पादकांची बाजारात फुलांची विक्री करण्यासाठी धावपळ दिसली. यावर्षी दिवाळीनिमित्त व्यापारी पेठेत विविध प्रकारचे आकाश कंदील, लाईट व रंगीबिरंगी प्लास्टिक फुलांच्या माळा व रांगोळीचे स्टॉल दिसून आल्याने गुरुवारी शिर्डी व राहाता शहरात नागरिकांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याने बाजारपेठ फुलून गेली.
आकाश कंदील तसेच विविध प्रकारच्या लाइटिंग माळा व विद्युत रोषणाईसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी करण्यासाठी यावर्षी ग्राहकांनी प्रामुख्याने चिनी वस्तूऐवजी स्वदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी चांगली पसंत दर्शविल्याने व्यवसायिकांसाठी देखील ही दिवाळी आनंदाची आहे.
बाळासाहेब बांगर,व्यावसायिक, राहाता





