Satara : शासनाच्या योजनांचे लाभ ग्रामीण पत्रकारांना मिळावेत

मेढा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण पत्रकारांनाही मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन व पत्रकार दिनाचे निमित्ताने जावळीचे तहसीलदार हणमंतराव कोळेकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असताना ग्रामीण पत्रकारांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. अधिस्विकृतीधारक पत्रकारांना गंभीर आजार, अपघात झाल्यास किंवा निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत, त्याचप्रमाणे पत्रकारांचेप्रमाणे पती-पत्नी व अवलंबून असलेले मुले यांना आजारपणांमध्ये आर्थिक मदत. एसटी महामंडळाच्या साधी ,निमआराम बसेस मधून मोफत प्रवास, ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा सन्माननिधी दिला जात असून या सर्व योजनांचा लाभ सर्वच (ग्रामीण) पत्रकारांनाही मिळावा.
ग्रामीण पत्रकार हे पदरमोड करून तळागाळापर्यंत जाऊन जनतेच्या समस्या, अडीअडचणी शासन दरबारी पोहोचवण्याचे काम करतात. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. मात्र, ग्रामीण पत्रकार शासनाच्या विविध लाभाच्या योजनापासून लांब आहे. पत्रकारांसाठी टोल माफीची घोषणा शासनाने केली होती.
मात्र, अद्याप त्याची बजावणी झाली नाही. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा-जावळी विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे, तालुका प्रसिद्धी प्रमुख नारायणराव शिंगटे, युवा कार्यकर्ते मोहन देशमुख उपस्थित होते.





