रूपगंध : श्रद्धांजली

सकाळचे 6.25 झालेत. आई आशाच्याजवळ बसली. तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली, “ए बाळा, मला चिडायला लावू नकोस. साडेसहा वाजायला आलेत. शाळेच्याजवळ घर असलं म्हणून काय झालं? सात वाजेस्तोवर सगळं आवरायला नको का? आपली शाळा सव्वासातला आहे. शाळेची पहिली घंटा वाजल्यावरच निघायचं का शाळेत जायला? सगळं आवरायला वीस मिनिटं आणि वेणी घालायला तितकाच वेळ लागणार. चल उठ, तोंड धुऊन घे, मी दूध गॅसवर ठेवतीय.’
“आई, मला खरंच कंटाळा येतो गं त्या वेणी घालण्याचा. तू आणि बाबा बॉबकट पण करून देत नाही. मला स्टुलावर बसवायचं, मग तू केस सोडणार, विंचरणार, माझ्या बाळीचे केस कसे गुडघ्यापर्यंत आहेत म्हणून तू कौतुक करत ते गोंजारत बसणार. शाळेचा नियम म्हणून त्याच्या दोन वेण्या घालणार. त्या मध्ये दुमडून कानाच्या वर रिबिनी बांधणार. मला खूप वैताग आलाय या केसांचा.’
“असं वैतागून कसं चालेल? आपलं छान दिसणं त्याच्यावर अवलंबून आहे की नाही? इतर मुली आणि त्यांच्या आया तुझ्या केसांबद्दल किती बोलत असतात. आपलं आडनाव कुलकर्णी. वर्गात चार कुलकर्णी. लांब केसाची कुलकर्णी म्हणून तुला ओळखतात की नाही?’
आई आणि आशा, बाबा आणि आशा, शाळा आणि आशा, वाडा आणि आशा.. माया, कौतुक, अभिमान. सरसर वर्ष मागे पडली. दहावी झाली, ज्यूनिअर कॉलेज झालं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. सुरुवातीला घरी मैत्रिणींची चिवचिव असायची आता त्याच्या जोडीला घोगरा आवाज मिसळत मित्रदेखील यायला लागले. इतकी वर्षे माझे केस कापायचेत म्हणून हट्ट करणारी आशा कॉलेजमध्ये रुबाबात कमरेखाली रुळणारे केस उडवत स्कुटरवरून फिरायला लागली.
आई आणि बाबा यांच्या बोलण्यात आता एक नवा विषय आणि काळजी यायला लागली. आशा हुशार आहे, वेळच्यावेळी अभ्यास करतीय आणि वेळच्यावेळी पास होतीय. ही कुणाच्या प्रेमात पडायला हरकत नाही. पण हिच्या केसांच्यावर भाळून कुणी नकोसा तिच्या सहवासात आला तर… तशी ही भोळी नसली तरी खमकी नाही. शेवटी वय आहे, मोह आहे, स्वप्न आहेत. वास्तवाची नीटशी पारख तिच्याकडं आहे का?
आशाचं शेवटचं वर्ष चालू झालं आणि आईला खोकला सुरू झाला. अनेक डॉक्टर झाले पण खोकला आटोक्यात येत नव्हता. बाबा निवृत्त झाले तेव्हा आईच्या औषधपाण्याचा खर्च ही विचारात घ्यायची गोष्ट बनली. त्यातच आशानी एक मनसुबा जाहीर केला. बीई झाल्यावर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं. महत्त्वाकांक्षा पुरी व्हायला हवी अशी होती.
आर्थिक घडी कशी बसवावी? त्यात एकुलती एक मुलगी परदेशात पाठवायची. तिला घरी यायला कितीशी सवड मिळणार? तिथलं शिक्षण संपल्यावर ती नोकरी, व्यवसायात पडणार. त्यासाठी ती भारतात येईल की तिथंच अमेरिकेत आपलं बस्तान बसवेल? यात तिच्या लग्नाचं काय? अजुनी तरी तिनी तिचं कुठं जमवल्याचं कानावर नाही. पण एकना एक दिवस ते होणारच. कांदे पोहे कार्यक्रम करून लग्न करण्यातली आशा नाही.
उलटसुलट विचार आई बाबा दोघेही करत होते परंतु एकमेकांना त्रास होऊ नये म्हणून त्याचा उच्चार टाळत होते. अशात एक दिवस आशाची मामेबहीण घरी आली. आल्याआल्या आशाला म्हणाली, “आशा, चल जरा बाहेर जाऊन येऊ.’ आशाची नात्यानं जरी ती बहीण असली तरी एरवी त्या दोघींचं एकमेकींशी वागणं मैत्रिणीसारखं होतं. बाहेर पडताच ती आशाला म्हणाली, “मला अजिबात पाल्हाळ न लावता एक गोष्ट तुला विचारायची आहे. तुझं कुणाशी काही आहे का?’
“छे गं.’
वाट पाहिल्यासारखं उत्तर मिळताच ती म्हणाली, “माझा एक लांबचा दीर आहे. त्यांनी तुला बघितलं, खरं तर तुझे लांबसडक केस पाहिलेत. तुझ्या पाठमोऱ्या दर्शनानं तो पुरता घायाळ झालाय. तुला त्याचा फोटो दाखवते. तू हो म्हणत असशील तर तुझ्या आईबाबांपाशी विषय वाढवते.’
हा मुलगा उच्चशिक्षित, एका भावाचा दादा. एका विदेशी कंपनीमध्ये काम करतो. याचे वडील सरकारी अधिकारी आणि आई शाळेत शिक्षिका. एक मध्यम आकाराचा फ्लॅट आहे. दिसायला वाईट नाही. ज्याला व्यसन म्हणावं असलं काही तो करत नाही. सध्या जरी भारतात असला तरी कदाचित पुढच्यावर्षी परदेशात असेल.
ही माहिती ऐकताच बाबा उत्साहित झाले. काळजी खरी ठरतीय म्हणून आईनी डोळ्याला पदर लावला. लग्न ठरलं, झालं, दीड वर्षात विमान जपानच्या दिशेनी झेपावलं.
चार आठ दिवसांनी ख्यालीखुशालीचा फोन. न चुकता आई तिची चौकशी करतीय.तिचा मुद्दा लक्षात आलाय असं आशा आणि जावई दोघेही एकमुखी सांगतात. या आशादायक बोलण्यानेदेखील आईची कळी खुलते.
अडीचवर्षांनी लेक दहा पंधरा दिवसासाठी माहेरी येते. सकाळी आईच्या पुढ्यात केस सोडून बसते. यूट्यूबवरील पाहिलेल्या सगळ्या केशरचना आई आशाच्या डोक्यात बसवते. केळवणासाठी जसे नातेवाईक मित्रमंडळ दिवस ठरवतात तशी ठरवाठरवी होते. दिवस भुर्रर्कन उडून जातात. आता किमान दोन वर्षे लेकीची गाठ पडणार नाही म्हणून संपूर्ण घर कासावीस होत राहतं.
अलीकडं आईचा खोकला थोडा वाढलाय याची जाणीव आशाला फोनवरच्या बोलण्यातून होतीय. बाबा निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून बायकोला घेऊन जपानला आशाकडं जायचं नियोजन करतात. अनपेक्षितपणे दीड वर्षाच्या आतच आशा चक्क एक महिन्यासाठी भारतात आली. आईबाबांच्या वाट्याला पंधरा दिवस आले. त्यांना ही पर्वणीच होती. इतका दीर्घकाळ आशा माहेरी राहूनही आई आशाला म्हणत राहिली, “अजून थोडी राहिली असतीस तर…’
“आई, अगं मी जॉब करतीय, तुझ्या जावयाला कदाचित प्रमोशन मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. आम्हाला ठरल्यादिवशी ऑफिसला रुजू व्हावंच लागेल.’
आशाला जाऊन दोन महिने झाले. आईचा फोन, “आशा बाळे कधी येशील?’
“आई कमाल आहे हं तुझीपण. जेमतेम दोनच महिन्यापूर्वी आम्ही येऊन गेलो तरी तुझं समाधान नाही. पुन्हा येणं कसं शक्य आहे? तुला आमच्या अडचणी समजत नाहीत का?’
“समजतात गं… पण माया मोठी वाईट असते. बघ काही जमतंय का.’
पंधरा वीस दिवस जातात पुन्हा फोन, “जमेल का गं यायला?’ पुन्हा तेच उत्तर.
पंधरा वीस दिवस जातात पुन्हा फोन, “जमेल का गं यायला?’ पुन्हा तेच उत्तर. परंतु काहीसं विचलित झालेलं.
अपरात्री फोन वाजला. काल आईला हृदयविकाराचा झटका आला म्हणून ऍडमिट केलं. पण… आशा दहा मिनिटांपूर्वी आई गेली.
तीन महिन्यांपूर्वीच भारतात आलेल्या आशाला नवऱ्यासह परत यावं लागलं. आईचे दिवस होताच ती जायला निघाली. बाबानी मूक निरोप दिला. आईचे ते नेहमीचे वाट अडवणारे हवेहवेसे शब्द न ऐकताच आशा परत गेली. उद्या आईचा प्रथम स्मृतिदिन. आशा जपानमध्येच. अत्यंत अस्वस्थ. भावविभोर.
दुसऱ्या दिवशी आईच्या प्रतिमेला आशा आणि जावयानी पुष्पहार घातला, उदबत्ती लावली. ओलावता स्वर तोंडातून काढला नाही. संध्याकाळी नवरा आला. घर मुद्दाम अंधारात. आत आला, समोर आशा बसलेली. डोक्याभोवती स्टोल गुंडाळलेला. प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्यानी आशाकडं पाहिलं. तिनी स्वतःला स्थिर करत स्टोल काढला. डोक्याचं पूर्ण टक्कल केलेलं. त्यानं पुन्हा आशाकडं काळजीनं प्रश्नार्थक मुद्रेनी पाहिलं.
“मी एका विग बनविणाऱ्या कारखान्यात जाऊन केशदान करून आलीय. यातून चार पाच विग तयार होतील. कॅन्सरसाठी कोबाल्ट ट्रीटमेंट घेतल्यामुळे पेशंटचे केस झडतात. त्यांना हे विग देणार आहे. यापुढं आईच्या प्रत्येक स्मृतिदिनी मी नियमाने असंच केशदान करणार आहे.’ नवऱ्यानं आवेगानं तिला जवळ घेतलं. हीच त्याची सासूबाईंना श्रद्धांजली होती.
दीपक पारखी





