एखादे चित्र रंगवल्यानंतर जसे अप्रतिम दिसते त्याप्रमाणे असाही एक रंग असावा की जो आयुष्याला रंगवून जाईल. रंगाला आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे. विविध रंग हे विविध भावना प्रगट करत असतात. काळ्या रंगाच्या फलकावर जेव्हा पांढऱ्या रंगाचा खडू उमटतो तेव्हा त्याचं रूपांतर ज्ञानामध्ये होते. वास्तविक पाहता या रंगांमुळे आपलं जीवन हे रंगीत बनलेलं आहे. जर आपण अशी कल्पना केली की, आपल्या आयुष्यात कुठलाही रंग नाही तर ते आपल्याला उदासीन वाटेल, आयुष्य निरर्थक वाटेल पण याच आयुष्यात जर विविध रंग असतील तर ते आपल्याला प्रसन्न ठेवतील आणि आपल्या मनाला आनंद वाटेल. उदाहरणार्थ, एखाद्या रूममध्ये जर कुठलाही रंग नसेल किंवा कुठल्याही रंगाचा वापर करून सजावट केलेली नसेल किंवा रंगीबेरंगी सजावटीच्या वस्तू ठेवलेल्या नसतील तर त्या रूममध्ये आपल्याला बसायची इच्छा होत नाही. ती रूम आपल्याला उदासीन वाटते. यावरूनच आपल्याला रंगांच महत्त्व लक्षात येतं. त्याच जागी जर त्या रूममध्ये आपण खूप साऱ्या रंगीबेरंगी वस्तू ठेवल्या किंवा सजावट केली तर मन प्रफुल्लित होतं आणि तिथे बसायलासुद्धा छान वाटतं. एखाद्या वेळी जर मन उदास असेल आणि डोक्यात विचार सुरू असतील तर अशा परिस्थितीत जर एखादं सुबक, सुंदर रंगाने भरलेलं चित्र बघितलं तर मनाला आनंद मिळतो आणि थोड्या वेळासाठी का होईना आपण त्या चित्राच्या दुनियेत रमून जातो. एखाद्या चित्रकाराचा जर आपण विचार केला तर त्याचं संपूर्ण आयुष्य हे रंगाभोवतीच फिरत असतं. कारण चित्र काढणे व त्याला विविध रंगांनी रंगविणे हे त्याच्या जीवनाचं एक उद्दिष्ट असतं किंवा आपण असं म्हणू या की ते त्याचं प्रोफेशन असतं. त्यामुळे त्याच्या आयुष्यात रंगाला फार महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक वस्तू या रंगाशी निगडित आहे. अगदी आपल्या कपड्यांपासून ते घरातील विविध वस्तू या रंगांनी भरलेल्या असतात. रंगांवरूनच आपण विविध वस्तू पटकन ओळखू शकतो. बऱ्याचदा या रंगांची आयुष्याशी जोडणी केली जाते आणि आयुष्यालासुद्धा उपमा दिली जाते या रंगांची. जसं की, आयुष्य हे बेरंग झालेलं आहे, असं आपण का म्हणतो. कारण आपण उदास असतो. ही उदासीनता आपण रंगांद्वारे या वाक्यातून व्यक्त करतो. कधी कधी आपण असेही म्हणतो, माझं जीवन किती रंगीत आहे. असं आपण का म्हणतो? तर आपल्या आयुष्यात आपण खूप काही प्राप्त केलेलं असतं, हीसुद्धा एक उपमाच आहे जी जीवनाला आपण दिलेली आहे रंगांच्या माध्यमातून. रंग आपल्याला आकर्षित करून घेतात. उदाहरणार्थ, पाणी. जर आपण पाण्याचा विचार केला तर पाण्याला कुठलाही रंग नसतो. पण त्याच पाण्यात जर आपण एखादा रंग मिश्रित केला तर त्याला एक सुंदर रंग मिळतो, जे दिसायला अप्रतिम असतं. आपल्या भारतीय संस्कृतीत होळी हा एक सण आहे, ज्या दिवशी रंगांना फार महत्त्व असतं. रंगांना आपल्या आयुष्यात महत्त्व आहे. म्हणूनच कदाचित हा सण ठेवलेला असावा. रंगहीन या आयुष्याला थोडे रंगीत बनवूया हिरवा, पिवळा, लाल, गुलाबी कुठलाही एक रंग देऊया विविध रंगांनी जेव्हां नटेल आयुष्य तेव्हा येईल जगण्यात गोडी तरंगेल पाण्यावरती रंगीत रंगाची होडी – कविता स. रोहणे