हमासचा म्होरक्या इस्माईल हनियेपाठोपाठ हिजबुल्लाचा प्रमुख नेता हसन नसरुल्लालाही इस्राईलने नुकतेच ठार मारले. यानंतर इराणने इस्राईलवर 200 बॅलेस्टिक मिसाईल्स डागली आहेत. यामुळे आखातातील युद्ध नव्या वळणावर आले आहे. वास्तविक, इस्राईलकडून हुती, हिजबुल्ला आणि हमास या इराणपुरस्कृत संघटनांवर केल्या जाणार्या आक्रमक कारवायांमुळे आणि दक्षिण लेबनॉनमधील 800 हून अधिक पेजरस्ङ्गोटांनंतर इराणला कारवाई करणे अपरिहार्य होते. पण दीर्घकाळापासून चालत आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणकडून ङ्गार मोठी आक्रमक कारवाई केली जाण्याची शक्यता दिसत नाही. तसेच हिजबुल्लाही संघटनाही आता कमकुवत झाली आहे. हुती आणि हमासही इस्राईलच्या मार्यामुळे क्षीण झाल्या आहेत. इस्राईलवरही अमेरिकेचा दबाव आहे. परिणामी आखातातील युद्धाची व्याप्ती ङ्गार वाढण्याच्या शक्यता कमी आहेत. पण संघर्ष आणि तणाव कायम राहील असे दिसते. आठ ऑक्टोबर हा दिवस पश्चिम आशियात अनेक वर्षांपासून सुरू असणार्या इस्राईल-पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाच्या इतिहासात एक प्रमुख दिवस ठरला. याचे कारण बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच 8 ऑक्टोबर 2023 रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईलवर अत्यंत भीषण स्वरुपाचा दहशतवादी हल्ला केला होता. जगातील सर्वांत प्रभावी, निष्णात गुप्तहेर संघटना म्हणून ओळख असलेल्या मोसादला चकवा देत आणि संरक्षण साधनसामग्रीतील अद्ययावत तंत्रज्ञानाने निर्माण केलेले अभेद्य सुरक्षाकवच भेदत हमासने इस्राईलमध्ये मोठा संहार घडवून आणला. या हल्ल्यामुळे आखातात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेला मोठा सुरुंग लागला. वर्षभरापासून सुरु असलेल्या हमास, हिजबुल्लाह, हुती व इराण विरुद्ध इस्राईल यांच्यातील घनघोर संघर्षामुळे गाझापट्टीवर प्रचंड मोठी जीवित व वित्तहानी तर होत आहेच; पण आखातातील अशांततेचे आर्थिक पडसाद संपूर्ण जगालाही भोगावे लागत आहेत. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या यंदाच्या आमसभेदरम्यान इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी हे युद्ध पुढेही सुरूच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे इस्राईलने आपल्या शत्रूंविरुद्ध म्हणजेच हिजबुल्ला, हमास, हुती या दहशतवादी संघटनाच नव्हे तर त्यांच्या पाठीशी असणार्या इराण, सिरीया या राष्ट्रांविरुद्ध आर या पारची लढाई सुरु केली आहे हे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरामध्ये इस्राईलने गाझापट्टीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ले केले असून यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे; तर अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या घडामोडी पाहिल्यास त्या या संघर्षात पडद्यामागचा सूत्रधार असणार्या इराणपुढील अडचणी वाढवणार्या होत्या. इराणची राजधानी तेहरान येथे नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आलेला हमासचा म्होरक्या इब्राहीम हनिये याला इस्राईलने मारणे असो, त्यापाठोपाठ दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता असणार्या हसन नसरुल्ला यासह अनेक नेत्यांची हत्या असो किंवा लेबनॉनमध्ये घडून आलेले हजारो पेजर स्ङ्गोट असोत; इस्राईलकडून केल्या जाणार्या या आक्रमक कारवायांमुळे इराण पूर्णपणाने बॅकङ्गूटवर गेल्याचे दिसून आले होते. हसर नसरुल्ला याच्याविषयी जगभरातील शिया पंथियांमध्ये अत्यंत आदर होता. त्यामुळे इराणला या सर्वांविरोधात प्रत्युत्तरादाखल कारवाई करणे अपरिहार्य बनले होते. कारण इराणच्या राजधानीमध्ये घुसून इस्राईलकडून कारवायाला केल्या जात आहेत. हमास, हिजबुल्ला, हुती या इराणच्या इशार्यावर चालणार्या संघटनांचे अस्तित्वच पुसून टाकण्यासाठी इस्राईल वाटचाल करत आहे. अशा स्थितीत इराणकडून दिखावा म्हणून का होईना इस्राईलविरुद्ध एखादा हल्ला होणार याची अपेक्षा होतीच. त्यानुसार इराणने अलीकडेच इस्राईलवर 150 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्रांचा मारा केला. इराणच्या या हल्ल्यामुळे आखातात सुरू असलेले युद्ध चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी खोलात जाऊन विचार केल्यास वेगळेच चित्र समोर येते. आज इराणची अर्थव्यवस्था अमेरिकेसह जगाने टाकलेल्या निर्बंधांमुळे डबघाईला आली आहे. दुसरीकडे आखातातील सर्व सुन्नी मुस्लिम देश इस्राईलकडून होणार्या कारवायांबाबत कमालीचे शांत आहेत. हमासचा नेता हनिये मारला गेेला तेव्हाही या देशांनी कसलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आताही हसर नसरुल्लाला ठार मारल्यानंतरही हे देश शांत आहेत. किंबहुना सुन्नी मुस्लिम देशांमध्ये समाधानकारक भावना आहे. याचे कारण आखातामधल्या एकूणच हिंसाचारामध्ये आणि दहशतवादामध्येे या दोन नेत्यांचा मोठा हात होता. त्यामुळे इस्राईलविरुद्धच्या लढ्यात इराण एकटा पडल्याचे दिसत आहे. तसेच हे युद्ध वाढवणे इराणला आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाहीये. इस्राईल हा अण्वस्रधारी देश आहे. तसेच इराणकडेही अणुबॉम्ब असण्याच्या शक्यतेमुळे अमेरिका व पश्चिम युरोपियन देशांनी त्यांच्यावर निर्बंध टाकलेले आहेत. सामान्यतः जेव्हा दोन देश अण्वस्रधारी असतात तेव्हा त्यांच्यामध्ये ‘बॅलन्स ऑङ्ग टेरर’ असतो. म्हणजेच आापण एकमेकांवर हल्ला केल्यास ‘मॅड’ म्हणजेच म्युच्युअली अॅश्युअर्ड डिस्ट्रप्शनची स्थिती ओढावू शकते याची दोघांनाही कल्पना असते. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते आपापसातील संघर्ष चिघळू देत नाहीत. हाच प्रकार इस्राईल-इराण संघर्षात दिसून येतो. आपण पोसलेल्या दहशतवादी संघटनांचे मनोबल टिकून राहावे यासाठी इस्राईलवर हल्ला करताना इराणने लो इंटेन्सिटी मिसाईल्स डागले आहेत. याला इस्राईलकडून याला ङ्गार मोठे प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता दिसत नाही. गेल्या वर्षभरातील युद्धसंघर्षाचा ङ्गटका इस्राईललाही बसला आहे. अमेरिका व युरोपियन देश रशिया-युक्रेन संघर्षात गुंतलेले आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी कोणत्याही प्रकारची मदत अमेरिकेकडून इस्राईलला केली जाणे शक्य होणार नाहीये. मुळातच इस्राईलकडे आयरन डोम नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून याद्वारे आकाशातून मारा करणारी क्षेपणास्रे हवेतच निष्प्रभ करण्यात येतात. त्यामुळेच इराणकडून 200 क्षेपणास्रे डागूनही इस्राईलमध्ये कसलीच जीवितहानी झालेेली नाहीये. तसेच हा संघर्ष अधिक चिघळू देऊ नये याबाबत इस्राईलवर अमेरिकेचाही दबाव आहे. सबब इस्राईल टप्प्याटप्प्याने या दहशतवादी संघटना उद्ध्वस्त करण्याची रणनीती कायम ठेवेल असे दिसते. तिसरीकडे लेबनान या देशाची निर्मिती मुळात आखातीतल ख्रिश्चन लोकांसाठी करण्यात आली. पूर्वी लेबनान ही ङ्ग्रान्सची वसाहत होती. सुरुवातीला लेबनानमधील 75 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन होती. पण अलीकडील काळात तेथे इस्लामिक लोकसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. हिजबुल्ला ही केवळ दहशतवादी संघटना नसून तो लेबनानमधील राजकीय पक्ष आहे. तेथील सरकारमध्ये हिजबुल्लाचे मंत्रीदेखील आहेत. या संघटनेकडे जवळपास एक लाखांहून अधिक संख्येचे सैन्य आहे. दोन लाखांहून अधिक संख्येने क्षेपणास्रे आहेत. 2005 मध्ये इस्राईल आणि हिजबुल्ला यांच्यात प्रचंड मोठा संघर्ष झाला होता. त्यानंतरच्या काळात या संघटनेने लेबनानमध्ये बंकर्सही विकसित केले आहेत. विशेषतः दक्षिण लेबनानमधील हिजबुल्लाच्या नेत्यांच्या व नागरिकांच्या घरांमध्ये शस्रास्रांचे तळ बनवण्यात आले आहेत. त्यामुळे इस्राईलकडून होणार्या हल्ल्यांमध्ये अनेकदा सामान्य नागरीक मारले जातात. या शियापंथिय संघटनेला आर्थिक, राजकीय आणि नैतिक पाठबळ इराणकडून मिळते. इस्राईलला नामोहरम करण्यासाठी इराण हिजबुल्लाचा वापर करत आला आहे. त्यामुळेच इस्राईलने या संघटनेचे अस्तित्वच पुसून टाकायचे या इराद्याने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. इस्राईलने अलीकडेच ग्राऊंड स्ट्राईक करण्यासाठी लेबनानमध्ये आपले सैन्य घुसवले आहे. आजघडीला हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या 800 हून अधिक पेजर ब्लास्टमुळे आणि आपल्या म्होरक्यासह अनेक नेत्यांची हत्या झाल्याने कमकुवत झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही मोठी कारवाई होण्याची शक्यता दिसत नाहीये. पॅलेस्टाईन हा मूलतः सुन्नी पंथिय देश आहे. संयुक्त अरब आमिराती, सौदी अरेबिया, कतार यांसारखे सुन्नीपंथिय देश पॅलेस्टाईनच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे होते. पण तसे न घडता इराणसारखा शिया पंथिय देश यामध्ये पॅलेस्टाईनसाठी लढतो आहे. याचे कारण सर्व सुन्नी पंथिय देशांना इस्राईलसोबत जुळवून घ्यायचे आहे. अरब राष्ट्रे आणि इस्राईल यांनी एकत्र यावे यासाठी अमेरिकाही प्रयत्नशील आहे. त्यातूनच भारत, अमेरिका, युएई आणि इस्राईल यांच्यात ‘अब्राहम अॅकॉर्ड’ हा करार अस्तित्वात आला. पण इराणचा याला विरोध आहे. त्यामुळेच अरब राष्ट्रांचे नेतृत्व करण्यासाठी इराण हमासच्या पाठिशी उभा असल्याचे दिसत आहे. पण अन्य देश याबाबत शांत आहेत. इराणला सिरीयाकडून थोडी ङ्गार मदत मिळत आहे. कारण सिरीयाही शिया पंथिय देश आहे. तो वगळता अन्य इस्लामिक राष्ट्रे कमालीची शांत आहेत. हसन नसरुल्ला हा शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथियांमध्ये लोकप्रिय होता. असे असूनही त्याची हत्या झाल्यानंतर इस्लामिक राष्ट्रातून ङ्गार मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. इराण हा गेल्या काही वर्षातील आर्थिक निर्बंधांमुळे प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. इराणमध्ये बेरोजगारी, बेकारी, गरीबी, उपासमार यांसारख्या अनेक समस्यांनी जनता त्रस्त आहे. अशा स्थितीत इराणला हे युद्ध लांबवणे परवडणारे नाही. ही सर्व परिस्थिती पाहता इस्राईल-इराण संघर्षाची व्याप्ती वाढण्याची शक्यता दिसत नाहीत. अर्थात इस्राईलकडून होणार्या गाझापट्टी बाहेरील हल्ल्यात सामान्य नागरिकांचा बळी जाऊ लागल्यास आजवर निष्क्रिय राहिलेले इस्लामिक देश सक्रिय होऊ शकतात. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक