भारताला मानवतावादी मूल्यांवर भर द्यावयचा आहे आणि राजकीय लाभापेक्षाही दीर्घकालीन मानवी संबंध सुधारण्याचा भारताने नेहमीच आग्रह धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुबईत झालेली भारत-अफगाण बोलणी दुहेरी हिताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या चर्चेसाठी दुबईची निवडही योग्यच होती. त्यामुळे दुबई हे भारत-अफगाण संवादाचे आणि सुसंवादाचे अर्थपूर्ण मैत्रीचा संदेश देणारे केंद्र बनले. दुबईतील चर्चा भारत व तालिबान सरकारमधील सुसंवादाचे नवे प्रमेय घेऊन समोर आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पारंपरिक आणि ऐतिहासिक मैत्रीला नव्या संदर्भात नवा उजाळा मिळत आहे. प्राचीन काळात गांधार देश म्हणून ओळखला जाणारा अफगाणिस्तान आता भारताच्या दृष्टीने बफर स्टेट म्हणून महत्त्वाचा आहे. विशेषतः भारताशी शत्रुत्व घेणार्या पाकिस्तानपासून आपला बचाव करण्यासाठी अफगाणिस्तान नेहमीच तटस्थ राहून आपल्या बाजूने भूमिका घेत आला आहे. अलिकडे, तालिबान सरकार आणि पाकिस्तानातील तणाव वाढले आहेत. तालिबान सरकार पाकिस्तानच्या कृष्णकृत्यावर प्रकाश टाकून त्याच्यावर हल्लेही करीत आहे. शिवाय तालिबान सरकारने भारतविरोधात दहशतवादी गटांना आपल्या भूमीचा वापर करू देणार नाही याची हमी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागातील दहशतवादी उपद्व्याप थोडेसे कमी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दुबईमध्ये झालेल्या भारत-अफगाणिस्तान मैत्री संवादाचे विशेष महत्त्व आहे. दुबईची योग्य निवडः भारत आणि अफगाणिस्तान या दोहोंनाही समान पातळीवर मित्र मानणार्या देशांमध्ये दुबईचे अग्रस्थान आहे. त्यामुळे उभयतांच्या चर्चेसाठी दुबई या योग्य स्थानाची निवड करण्यात आली. यापूर्वी निम्न सचीव स्तरावर बोलणी होत असत. पण प्रथमच यावेळी उच्च सचिव स्तरावर ही बोलणी झाली आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यात ही बोलणी झाली. या बोलणीला विशेष महत्त्व आहे. एस. जयशंकर यांनी म्हटल्याप्रमाणे, ही बोलणी कमी राजकीय आणि अधिक मानवतावादी आहेत. अफगाणिस्तान सध्या संकटात सापडलेला आहे. नुकताच भूकंपाच्या तडाख्यातून वाचल्यानंतर त्याला भारताने भरघोस मदत केली. शिवाय 50 मेट्रिक टन गहू, पोलियो लस, औषधे यांचा हप्ताही भारताने अफगाणिस्तानला दिला. ही मदत मानवी पातळीवर आहे. माणूस म्हणून अफगाणिस्तानातील दुःखी, कष्टी प्रजेला सहाय्य करणे आपले कर्तव्य आहे. कारण एके काळचे अफगाण हे भारतीय रक्ताचे, वंशाचे समूह आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळी अफगाणिस्तान संकटात सापडतो त्यावेळी भारत धावून जात असतो. यावेळी सुद्धा भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात दिला आहे ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घेतली पाहिजे. अफगाणिस्तानात महागाई आणि टंचाई तसेच दुष्काळाने कहर केला होता. त्यावेळी भारताने अफगाणिस्तानला सातत्याने अन्नधान्याचा पुरवठा केला आणि गव्हाचा पुरवठा केला. त्यामुळे अफगाणिस्तानमधील गोरगरीब लोकांना दोन वेळा सुखाचे जेवण प्राप्त होऊ शकले. त्यामुळे प्रत्येक अफगाण माणूस भारत आणि भारतीय संस्कृतीचा ऋणी आहे. शिवाय आता अफगाणिस्तानातील लोकांना भारतामध्ये आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. तेथील रुग्णांना भारतात आरोग्य सेवा आणि मुलामुलींना भारतामध्ये येऊन शिक्षण घेण्याची संधीही मिळणार आहे. ही सुद्धा आणखी एक जमेची बाजू आहे. पाकशी निकराचा संघर्षः अफगाणिस्तानचे असे म्हणणे आहे की, रावळपिंडीपासून काबुलपर्यंतचा एक पट्टा हा अफगाण लोकांच्या दाट वस्तीचा पट्टा आहे. या भागावर फार पूर्वीपासून अफगाण लोकांचे वर्चस्व आहे. विशेषतः काबुलपासून खैबरशिंडीपर्यंतच्या भागावर त्या चिंचोळी पट्टीवर आपले प्रभुत्व आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न अफगाणिस्तान अनेकवेळा करीत असतो. पण पाकिस्तान त्याचा हा दावा नाकारतो. त्यामुळे उभय देशात संघर्ष होतो. तेथील अफगाण क्रांतीकारकांना हुसकावून लावणे, त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांच्यावर लष्करी कारवाया करणे अशा प्रकारच्या अनेक घटना पाकिस्तानकडून होतात. पाकची अफगाणविरुद्धची आक्रमकता जशी वाढत आहे तशी भूराजनैतिक दृष्टीने भारताशी जवळीक होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. गेल्या काही वर्षामध्ये एकीकडे पाकच्या डोक्यावर बलुचिस्तानची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे अफगाण बंडखोर सुद्धा पाकिस्तान विरोधात कारवाया करीत आहेत. त्यामुळे पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील संघर्ष वाढला आहे. जणू उभयतामध्ये विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. या पार्श्वभूमीवर आता अफगाणिस्तानला पाकिस्तानशी अधिक संघर्ष करण्यासाठी भारतासारख्या सच्च्या मित्राचे सहाय्य हवे आहे. पण भारताने युद्धापेक्षाही शांतता व विकासावर अधिक भर दिला आहे. भारताच्या मते, सारे प्रश्न सामोपचाराने सोडविले पाहिजेत आणि विकासाच्या योजनांवर प्रथम भर दिला पाहिजे. अफगाणिस्तानच्या सामुदायिक विकासासाठी भारताचा प्रयत्न आहे. अफगाण देशातील लोकांच्या विकासाचे अनेक प्रकल्प भारताच्या मदतीने पुढे गतीमान होत आहेत. एक काळ असा होता, हमीद करझाई यांच्या काळात भारताने लोया जिरगा सभागृह बाधूंन दिले होते. आता तालिबान काळातसुद्धा अनेक अफगाण तरुण भारतात शिकण्यासाठी उत्सुक आहेत. सुरूवातीच्या काळात अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला भारताने कोणतेही सहकार्य केले नाही. किंबहुना आजपर्यंत त्याला राजकीय मान्यताही दिलेली नाही. परंतु मुत्सद्दी पातळीवरील बोलणी मात्र सुरू आहेत आणि आता काही प्रतिनिधी काबुलमध्ये जाऊन तेथील भारतीय दूतावासाचे कामकाज सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि भारत या उभय देशातील संबंध आता नव्याने खुलत आहेत, फुलत आहेत आणि ते समान शत्रू या समीकरणावर आधारून अधिक नवी गती घेत आहेत. काही नवे पैलूः भारत-अफगाण मैत्रीचे मानवतावादी सहाय्याबरोबरच काही नवे पैलू सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. या पैलूंमध्ये दहशतवादाशी सामना करणे, ड्रग्ज आणि मादक द्रव्ये यांची तस्करी रोखणे यासाठी समान मोहिमा आखणे याला महत्त्व देण्यात आले आहे. या कारणामुळे पाकिस्तानमधून होणार्या ड्रग्ज शिरकावास भारत प्रतिकार करू शकेल. शिवाय काश्मीर आणि अन्य सीमेवर अल कायदा, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा सारखे पाकिस्तानी दहशतवादी जे भारतात घुसतात त्यांना सुद्धा रोखणे शक्य होऊ शकेल. ही अफगाणिस्तानची भूमिका भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि पथकर ठरणारी आहे. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान नव्याने उघडलेले मैत्रीचे दरवाजे हे उभय देशातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक संबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तालिबानला शहाणपण सुचले व त्यांनी जर लोकशाही पद्धतीने कारभार सुरू केला तर अफगाणिस्तानातील प्रजा सुस्कारा टाकू शकेल. या बुद्धाच्या भूमीतील अफगाण बंडखोरांनी महिलांचा छळ कमी करावा. मुलींना शाळेपासून महाविद्यालयापर्यंत व विद्यापीठापर्यंत शिक्षणाचे दरवाजे उघडावेत ही भारताची भूमिका आहे. मानवी हक्कांचे त्यांनी रक्षण करावे हा आग्रह आहे. विशेषतः दहशतवादाच्या प्रश्नावर अफगाणिस्तानने घेतलेली भूमिका केवळ भारतालाच नव्हे तर जगाला स्वागतार्ह वाटणारी आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आपल्या भूमिचा उपयोग भारत विरोधी कारवायांसाठी करू देणार नाही असे अभिवचन दिले आहे. भारताच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत अफगाणिस्ताबरोबर क्रिकेटच्या माध्यमातून मैत्री वाढवित आहे. उभय देशातील क्रिकेट सामन्यांना सुद्धा त्यामुळे चांगले दिवस येतील. क्रीडा, आरोग्य, संस्कृती, शिक्षण या क्षेत्रात दोन्ही देशांना सहकार्याचा हात पुढे करण्यासाठी बराच वाव आहे. प्रश्न आहे तो तेथील राजकीय नेतृत्वाच्या शहाणपणाचा. हे शहाणपण उशीरा का होईना सुचू लागले आहे ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची म्हटली पाहिजे. 2020-21 मध्ये तालिबान सरकार अफगाणिस्तानात सत्तेवर आल्यानंतर हा पहिलाच संवाद दुबईमध्ये घडून आला. या संवादाचे असे अनेक पदर आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा पदर म्हणजे दहशतवादाविरुद्ध समान भूमिका हा आहे असे आम्हाला वाटते. विल्सन सेंटरच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक मायकेल कुगेलमन यांच्या मते, भारताची भूमिका ही मुत्सद्दीपूर्ण आणि तेवढीच दूरदृष्टीची आहे. भारताला राजकीय घटनेपेक्षाही मानवी कल्याणावर अधिक भर द्यावयाचा आहे. भारताची दुबई बोलणी ही व्यवहार्य आणि तेवढीच फलदायी आहे असे मत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मांडले आहे. अफगाण परराष्ट्र सचीव अमीर खान मुत्ताकी यांच्याबरोबर झालेली चर्चा ही एका नव्या अध्यायाची नांदी ठरावी अशी आहे. भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानात 3 बिलीयन डॉलर्सचे सहाय्य गुंतविले आहे. तसेच चाबहार या इराणमधील बंदराचा विकास केला आहे. त्याचा फायदा अफगाणिस्तानशी व्यापार व मानवी सेवा पुरविण्यासाठी होणार आहे. भारताचे ‘अॅक्ट वेस्ट’ हे नवे धोरण या मैत्रीचा आधार आहे. जरी भारताने तालिबान सरकारला मान्यता दिली नसली तरी प्राप्त परिस्थितीत पाकला प्रतिशह देण्यासाठी चेकमेट म्हणून भारत तालिबान सरकारशी व्यावहारिक संवाद साधत आहे. समारोपः या सर्व चर्चेवरून असे स्पष्ट होते की, आशियातील सत्तासमतोलात भारत-अफगाणिस्तान मैत्री अत्यंत महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या अतिरेकी लष्करी कारवायांना चेकमेट म्हणून अफगाणिस्तानचा उपयोग भारत करू इच्छितो. शिवाय केवळ एवढाच उपयोग नव्हे, तर औषधी, रसायने, शिक्षण, रोगप्रतिबंधक लसीकरण इत्यादी बाबतीत सहकार्य करून अफगाणिस्तानला सदैव परोपकाराची आणि कृतज्ञतेची भावना वाटावी असे भारताचे प्रयत्न आहेत. त्यामुळे पाकिस्तानपासून दहा हात दूर राहून अफगाणिस्तान भारताच्या बाजूने तर वळलेला आहेच. शिवाय पाकिस्तानच्या कृष्णकृत्यांना तोंड देण्यासाठी तो त्याच्यावर आक्रमण सुद्धा करीत आहे. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. पाकिस्तान बलुची प्रश्नामध्ये, अफगाण प्रश्नामध्ये जेवढा व्यग्र राहील, गुंतून राहील तेवढा त्याचा भारताला उपद्रव कमी होईल. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात केलेले निवेदन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारताला मानवतावादी मूल्यांवर भर द्यावयचा आहे आणि राजकीय लाभापेक्षाही दीर्घकालीन मानवी संबंध सुधारण्याचा भारताने नेहमीच आग्रह धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुबईत झालेली भारत-अफगाण बोलणी दुहेरी हिताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हा अर्थपूर्ण संवाद दोन्ही देशांना हितकर ठरणार आहे. विशेषतः तेथील महिला, मुले त्यांचे शिक्षण या बाबतीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि रचनात्मक स्वरुपाची आहे. त्यामुळे दुबईत झालेली बोलणी ही निश्चितच पथकर आणि हितकर आहेत आणि भविष्यात या मैत्रीला नवे वळण देणारी आहे. त्यामुळे दुबई हे भारत-अफगाण संवादाचे आणि सुसंवादाचे अर्थपूर्ण मैत्रीचा संदेश देणारे केंद्र बनले. दुबई बोलणी भारत व तालिबान सरकारमधील सुसंवादाचे नवे प्रमेय घेऊन समोर आली आहे. – प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर