नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू होऊ शकते. यासाठी दूरसंचार विभाग आणि ट्रायने तयारी जवळपास पूर्ण केली आहे. यामध्ये एलॉन मस्क यांची स्टारलिंक आघाडीवर असल्याचे समजते. उपग्रहाद्वारे इंटरनेटसेवा सुरू झाल्यानंतर मोबाईल नेटवर्क किंवा ऑप्टिकल ङ्गायबर किंवा लीज्ड लाइनवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. घराच्या किंवा ऑङ्गिसच्या छतावर डिश ठेवून सुपरङ्गास्ट इंटरनेटचा वापर करता येऊ शकेल. सध्या भारतातील अनेक क्षेत्रात मोबाईल नेटवर्क पोहोचलेले नाही. उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर ही उणीव भरून निघणार आहे. इंटरनेट सेवेशी जोडले गेल्याने या भागातील लोकांशी संवाद साधणे सोपे होईल. एकविसाव्या शतकात घडणार्या अभूतपूर्व क्रांतीयुगाच्या मुळाशी संगणक आणि त्यापेक्षा संगणकावरील इंटरनेट नामक सुविधा आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेटचा शोध लागला, तेव्हा हा शोध उत्क्रांतीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असे कुणाला वाटलेही नसेल. सुरुवातीपासूनच या शोधाचा व्यावसायिक पैलू विकसित होण्यास सुरुवात झाल्यामुळे इंटरनेट आधी विकसित देशांची मक्तेदारी बनून राहिला होता. परंतु हळूहळू विकसनशील देशांच्या दिशेने इंटरनेटची पावले वळली आणि आता जगभरात इंटरनेट हा मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण पैलू बनून गेला आहे. अनेक सेवा इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. नवनवीन सेवा इंटरनेटशी जोडल्या जात आहेत. स्मार्टङ्गोनच्या माध्यमातून इंटरनेट तळहातावर आले आणि मग त्याच्या विकासाचा वेग शतगुणित झाला. आता बसल्या जागेवरून आपण अनेक गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो. ङ्गोरजीचे युग आल्यानंतर भारतात बँकिंगपासून अनेक क्षेत्रात झालेला कायापालट आपण पहात आणि अनुभवत आहोत. मात्र अद्याप देखील जगातील विविध देशांबरोबरच भारतातही अशी बरीच ठिकाणे आहेत जेथे अद्याप इंटरनेट सेवा, ऑप्टिकल ङ्गायबर पोहोचले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या भागात मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किंवा ऑप्टिकल ङ्गायबर लाइन टाकण्यासाठी खूप खर्च येतो. यामुळे दूरसंचार कंपन्यांना इच्छा असूनही तेथे नेटवर्क पोहोचू शकत नाहीत. परंतु इंटरनेटच्या क्षेत्रात आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे आता ही उणीव दूर होणार आहे. हे नवे तंत्रज्ञान म्हणजे सॅटेलाईट इंटरनेटसेवा. उपग्रहांच्या साहाय्याने छायाचित्रे तसेच विविध प्रकारचा डेटा मिळू लागल्यानंतर झालेली प्रक्षेपणक्रांती आपण पाहिली आहे. पण आता याच उपग्रहांद्वारे थेट इंटरनेटसेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी ङ्गार काळ वाट पहावी लागणार नसून नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी दूरसंचार विभाग आणि ट्रायने तयारी जवळपास पूर्ण केली आहे. या नव्या सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राचे भविष्य पूर्णपणे बदलून जाईल, असे काहींचे म्हणणे आहे. पण प्रत्यक्षात तसे घडेल का? सॅटेलाईट इंटरनेटसेवा कशा प्रकारे काम करते? त्याचे नेमके ङ्गायदे काय आहेत? यामध्ये कोणकोणत्या देशी-विदेशी कंपन्या सहभागी आहेत? हे यानिमित्ताने जाणून घेणे औचित्याचे ठरेल. या शर्यतीत मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेल व्यतिरिक्त एलोन मस्कची स्टारलिंक आणि अॅमेझॉन आघाडीवर आहेत. वास्तविक पाहता, भारतात सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी जगप्रसिद्ध अब्जाधिश एलॉन मस्क याची स्टारलिंक ही कंपनी अनेक महिन्यांपासून खटाटोप करत होती. स्टारलिंक ही स्पेस एक्सची उपकंपनी आहे. मस्कच्या या कंपनीने जवळपास 2700 उपग्रह अवकाशात प्रस्थापित करुन ग्लोबल स्टारलिंक नेटवर्क तयार केले आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसारख्या अनेक देशांत बीटा टेस्टिंगच्या माध्यमातून या उपग्रहाद्वारे इंटरनेटसेवेचा वापर लोक करत आहेत. आपल्याला आठवत असेल तर पहा, ङ्गेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि रशियन हॅकर्सनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला ते व्हिडिओ क्लिप सादर करुन युक्रेनच्या जनतेला आवाहन करताना दिसायचे. त्यावेळी त्यांना एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीकडून इंटरनेटसेवा पुरवली जात असल्याचे नंतर समोर आले होते. स्टारलिंक कंपनीच्या आगामी योजना पाहिल्यास 12000 सॅटेलाईटस्चे नेटवर्क आगामी काळात ही कंपनी तयार करणार आहेत. सॅटेलाईट इंटरनेट कसे काम करते? यामध्ये जेव्हा वापरकर्ते इंटरनेटसाठी विनंती करतात तेव्हा ती विनंती प्रथम सॅटेलाइट डिशमधून उपग्रहाकडे पाठविली जाते. उपग्रह जमिनीवर असलेल्या नेटवर्क ऑपरेशन सेंटरला वापरकर्त्यांच्या विनंत्या पाठवतो. हे केंद्र इंटरनेटशी जोडलेले असल्याने तेथून आवश्यक डेटा गोळा केला जातो आणि उपग्रहाद्वारे वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर परत पाठविला जातो. उपग्रहाद्वारे पाठवलेला डेटा वापरकर्त्याच्या डिशवर प्राप्त होतो, नंतर मॉडेम ते डीकोड करतो आणि वापरकर्त्याच्या संगणकावर किंवा इतर उपकरणावर प्रसारित करतो.सॅटेलाइट इंटरनेट उच्च बँडविड्थ हाताळू शकते. यामुळे पीक टाईममध्ये बरेच युजर्स असले तरीही इंटरनेट स्पीडमध्ये ङ्गरक पडणार नाही. उपग्रह सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेट वापरण्यासाठी मोबाईल नेटवर्क किंवा ऑप्टिकल ङ्गायबर किंवा लीज्ड लाइनवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. घराच्या किंवा ऑङ्गिसच्या छतावर छत्री ठेवून सुपरङ्गास्ट इंटरनेटचा वापर करता येतो. स्टारलिंक सध्या 250 ते 300 एमबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा देत आहे. भारतात ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात सॅटेलाईट इंटरनेटद्वारे कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मदत पुरवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्त पैसे दिले जात असले तरी वापरकर्त्यांना इंटरनेटचा योग्य स्पीड मिळत नाही. यावर सॅटेलाइट इंटरनेट सेवा उपयुक्त ठरू शकते. ‘स्टारलिंक’द्वारे अगदी आकाशात उडत असतानाही हाय स्पीड इंटरनेटचा वापर करता येऊ शकतो. यामुळेच सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यास सरकार आणखी विलंब करणार नाही असे दिसते. असे असले तरी सॅटेलाईट इंटरनेटसेवेच्या काही मर्यादाही आहेत आणि त्या लक्षात घेणे गरजेचे आहे. या सेवेसाठी लेटेंसी ही एक समस्या ठरु शकते. तसेच या इंटरनेट सेवेसाठी आकाश निरभ्र असणे आवश्यक आहे, असे सांगण्यात येत आहे. मुसळधार पाऊस किंवा जोरदार वारा कनेक्शनमध्ये व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होऊ शकतो. प्रत्यक्षात या सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर त्याचे तपशील नेमकेपणाने समोर येतील. यामध्ये मुख्य मुद्दा असेल तो दरांचा. कारण ज्या भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी या सेवेचा ङ्गायदा होईल असे सांगितले जात आहे, त्या भागात प्रामुख्याने अल्प व निम्न उत्पन्न स्तर असणार्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा भागातील लोकांसाठी इंटरनेट उपलब्ध करुन देताना त्याचा दर परवडणारा असणे आवश्यक आहे. अन्यथा या योजनेचा ङ्गियास्को होण्यास वेळ लागणार नाही. एलॉन मस्क हा पक्का व्यावसायिक व्यक्ती आहे. भारतातील दूरसंचार क्षेत्रात कमी कमी होत गेलेली स्पर्धा आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कंपन्यांच्या हाती एकवटलेली ही सेवाप्रणाली व त्यांचे वाढत चाललेले दर लक्षात घेऊन जर स्टारलिंकने किङ्गायतशीर दरात दर्जेदार व वेगवान इंटरनेटसेवा देण्यात यश मिळवले तर प्रस्थापित कंपन्यंापुढे नवे आव्हान उभे राहू शकते. जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टारलिंकच्या या नव्या प्रकल्पाविषयी चर्चा करताना डेटा सुरक्षेचाही विचार करायला हवा. व्हीपीएन ही इंटरनेटवर वापरली जाणारी सेवा डेटा लीकेजपासून संरक्षण करते आणि गोपनीयता प्रदान करते. परंतु सॅटेलाईट इंटरनेट सेवा या व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सेवांशी सुसंगत नाहीत. त्यामुळे मस्क यांच्या कंपनीच्या भारतात प्रवेश मिळवण्यासाठीच्या धडपडीमागे डेटा हा घटक तर कारणीभूत नसेल ना, अशी चर्चा सुरू आहे. अमेरिका आणि तेथील धनाढ्य उद्योगपती व या महासत्तेचे एकूण जागतिक कारनामे यांचा प्रदीर्घ इतिहास पाहता अशा चर्चा निरर्थक म्हणता येत नाहीत. – महेश कोळी, संगणक अभियंता