गेल्या पाच वर्षांपासून ‘ब्रिक्स’देशांच्या परिषदेत त्यांच्या स्वतंत्र चलनाची भाषा केली जात असली, तरी हे चलन प्रत्यक्षात आलेले नाही. युरोपीय महासंघाने अगोदरच युरो चलन आणले आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘ब्रिक्स’चलन प्रत्यक्षात आले, तर अमेरिकी डॉलरचे जागतिक उलाढालीतील महत्त्व कमी होईल. त्यामुळे ‘ब्रिक्स’ परिषदेत स्वतंत्र चलनाची भाषा होताच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प धास्तावले आहेत. त्यांनी ‘ब्रिक्स’ देशांना त्यांचे चलन आणले, तर आयातशुल्क वाढविण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांना हा इशारा का द्यावा लागला, हे जाणून घेतले पाहिजे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ देशांना डॉलरला पर्याय शोधण्या विरोधात कडक इशारा दिला. डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिक्स देशांवर शंभर टक्के आयात शुल्क लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ‘ब्रिक्स’ मध्ये चीन आणि भारत या जगातील दोन मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांमध्ये चीनी उत्पादनांवर ६० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारयुद्ध आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात होती. गेल्या अनेक वर्षांत ट्रम्प यांनी अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसनबाबत भारतावर निशाणा साधला आहे. ट्रम्प अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला मित्र म्हणत आहेत; पण व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवर ट्रम्प भारताला कोंडीत पकडण्याची संधी गमावत नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मच्या हँडलवर लिहिले, की आम्हाला या देशांकडून वचनबद्धतेची गरज आहे, की ते नवीन ‘ब्रिक्स’चलन तयार करणार नाहीत किंवा मजबूत अमेरिकी डॉलर बदलण्यासाठी दुसऱ्या चलनाला समर्थन देणार नाहीत. त्यांनी स्वतंत्र चलन देण्याचा विचार केला, तर त्यांना शंभर टक्के शुल्काचा सामना करावा लागेल. ‘ब्रिक्स’ देशांनी असे केले, तर त्यांना अमेरिकेच्या बाजारात त्यांची उत्पादने विकण्याचा निरोप घ्यावा लागेल. ‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरची जागा घेऊ शकतील अशी कोणतीही शक्यता नाही आणि असे करणाऱ्या कोणत्याही देशाने अमेरिकेचा निरोप घेतला पाहिजे. गेल्या ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान शहरात ‘ब्रिक्स’ची बैठक झाली. या गटाने स्वत:चे चलन निर्माण करण्याबाबत चर्चा केली. या वर्षी रशियाने ‘ब्रिक्स’परिषदेचे अध्यक्षपद भूषवले असून ‘ब्रिक्स’ चलन सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. रशियाने २०२२ मध्ये ब्रिक्स चलन आणण्याची कल्पना पुढे आणली होती. तिला ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी पाठिंबा दिला होता. कझान बैठकीत ‘ब्रिक्स’ चे समान चलन आणण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही; परंतु या देशांदरम्यान सीमापार पेमेंटची एक नवीन प्रणाली तयार करण्यावर चर्चा झाली. ती पाश्चात्य पेमेंट सिस्टम ‘स्विफ्ट नेटवर्क’ सोबत काम करेल. ‘ब्रिक्स’देशांना आपापसात स्थानिक चलन शक्य तितके वापरायचे आहे जेणेकरून डॉलरच्या तुलनेत त्यांच्या चलनांच्या चढ-उताराचा धोका कमी करता येईल. कझान परिषदेदरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले होते, ‘द्विपक्षीय व्यापारात स्थानिक चलनांचा वापर राजकारणमुक्त आर्थिक विकासास मदत करेल. जागतिक आर्थिक व्यवस्थेत डॉलर हे प्रमुख चलन राहील आणि त्याचा वापर राजकीय उद्दिष्टं साध्य करण्यासाठी केल्याने चलनावरील विश्वास कमी होतो आणि त्याची क्षमता देखील कमी होते. रशियाला डॉलर सोडायचा नाही किंवा त्यास पराभूत करायचे नाही; पण त्याला डॉलरसोबत काम करण्यापासून रोखले जात आहे, म्हणून आम्हाला दुसरा पर्याय पाहणे भाग पडले आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले आहेत. ब्रिटन आणि युरोपीयन महासंघ तसंच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानसह अनेक देशांनी रशियावर १६ हजार ५०० हून अधिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनुसार, रशियाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीपैकी निम्मी रक्कम गोठवण्यात आली आहे. ती सुमारे २७६ अब्ज डॉलर आहे. याशिवाय, युरोपीय महासंघाने रशियन बँकांची सुमारे ७० टक्के मालमत्ता गोठवली आहे आणि त्यांना ‘स्विफ्ट’ बँकिंग प्रणालीतून वगळले आहे. जगातील बहुतेक देश फक्त डॉलरमध्ये व्यवसाय करतात. जर ‘ब्रिक्स’ चलन आले तर ते डॉलरची जागा घेईल का, हा खरा प्रश्न आहे. त्याचे कारण ‘ब्रिक्स’ देशांसाठी समान चलन तयार करणे अव्यवहार्य ठरेल कारण त्यांची अर्थव्यवस्था खूप वेगळी आहे. असे असले, तरी भविष्यात ते आंतरराष्ट्रीय व्यापार पेमेंटसाठी नवीन चलन तयार करण्याचा किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी क्रिप्टो चलन निवडण्याचा विचार करू शकतात. जगभरातील व्यवसायिक व्यवहार, आंतरराष्ट्रीय देयके, कर्जे आणि आयात-निर्यात अमेरिकन डॉलरमध्ये केली जाते. जागतिक चलन साठ्यात डॉलरचा वाटा ५९ टक्के आहे, तर जगातील एकूण कर्जापैकी ६४ टक्के व्यवहार डॉलरमध्ये होतात. आंतरराष्ट्रीय व्यवहारातही डॉलरचा मोठा वाटा आहे. युरोच्या निर्मितीपासून डॉलरचे वर्चस्व किंचित कमी झाले आहे; परंतु तरीही ते जगातील सर्वाधिक वापरले जाणारे चलन आहे. ‘ब्रुकिंग्स’च्या डेटानुसार, डॉलरचे विदेशी पेमेंटवर वर्चस्व आहे आणि त्याचा वाटा ८८ टक्के आहे; मात्र गेल्या अडीच दशकांत डॉलरचे वर्चस्व कमी झाले आहे. जागतिक साठा म्हणून अमेरिकन डॉलरचा वाटा १२ टक्क्यांनी घटला आहे. २००० मध्ये जागतिक साठ्यातील त्याचा वाटा ७१ टक्के होता, जो २०२४ पर्यंत वाढून ५९ टक्के होईल. ‘ब्रिक्स’ ही विकसनशील अर्थव्यवस्थांची आर्थिक संघटना आहे. त्यात सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत, चीन यांचा समावेश होता आणि २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकादेखील त्यात सामील झाली. अलीकडच्या काळात या आर्थिक आघाडीत अनेक विस्तार झाले आहेत. त्यात जानेवारीत इजिप्त, इराण, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरातीदेखील ‘ब्रिक्स’ मध्ये सामील झाली. उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील श्रीमंत देशांच्या राजकीय आणि आर्थिक शक्तीला आव्हान देण्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाच्या विकसनशील देशांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘ब्रिक्स’ ची स्थापना करण्यात आली. सौदी अरेबियानेही या गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर अझरबैजान आणि तुर्कस्तानने ‘ब्रिक्स’मध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला आहे. जवळपास ३० अन्य देशांनी ब्रिक्समध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ब्रिक्स देशांची एकूण लोकसंख्या सुमारे ३.५ अब्ज म्हणजेच जगाच्या ४५ टक्के आहे, तर सदस्य देशांची एकूण अर्थव्यवस्था २५.५ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त आहे, जी जागतिक अर्थव्यवस्थेच्या २८ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे पाहिले पाहिजे. ‘ब्रिक्स’ देशांनी दुसऱ्या चलनाला पाठिंबा दिल्यास त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ‘ब्रिक्स’च्या माध्यमातून ट्रम्प रशियाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, की मजबूत डॉलर कमकुवत होण्याची भीती त्यांना वाटत आहे? डॉलरची ताकद हे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. ‘ब्रिक्स’मध्ये सध्या भारतासह नऊ देशांचा समावेश आहे. चीन आणि रशियासोबत अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण आहेत. तज्ज्ञांच्या मते, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर चीन आणि रशिया एकमेकांच्या जवळ आले आहेत. दोन्ही देश अमेरिकेचे वर्चस्व असलेली जागतिक व्यवस्था नाकारून बहुध्रुवीय जग निर्माण करण्याविषयी बोलत आहेत. त्यामुळेच हे दोन्ही देश अनेक दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला जगात आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षभरापूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सांगितले होते, की त्यांना आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकन देशांशी अमेरिकन डॉलरऐवजी चीनी चलन युआनमध्ये व्यापार करायचा आहे. चीन याआधीच रशियासोबत त्याच्या चलन युआनमध्ये व्यापार करत आहे. रशियाही असेच बोलत आहे. कारण अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी त्यावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिका, युरोपीयन महासंघ, ब्रिटन आणि त्यांच्या अनेक सहयोगी देशांनी अनेक रशियन बँकांना ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीतून वगळले आहे. ‘स्विफ्ट बँकिंग इंटरनॅशनल’वर अमेरिका, युरोप आणि पाश्चात्य देशांचे वर्चस्व आहे. कोणत्याही देशावर निर्बंध लादले जातात, तेव्हा ते या व्यवस्थेपासून अलिप्त होते. रशियावर ज्या प्रकारे निर्बंध लादले गेले आहेत, ते पाहता भविष्यात आपली बँकिंग ब्लॉक होऊ नये, असा विचार ‘ब्रिक्स’ देश करत आहेत. त्यामुळेच हे देश पर्यायी आर्थिक नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘ब्रिक्स’ देश अशी योजना बनवत असले, तरी ते इतक्या लवकर होणार नाही; मात्र काही उपक्रम सुरू झाले आहेत. चीन ब्राझीलशी युआनमध्ये करार करत आहे. चीनने ब्राझीलशी करार केला आहे. सौदी अरेबियाने रशियाशी असाच करार केला आहे आणि तसा ट्रेंड सुरू झाला आहे. डॉलरच्या तुलनेत कोणतेही चलन उभे राहणे खूप लांब आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या मते, जागतिक जीडीपीमध्ये ‘ब्रिक्स’चा वाटा सुमारे ३७ टक्के आहे. ‘ब्रिक्स’ मध्ये समाविष्ट संयुक्त अरब अमिराती आणि इराण हे कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवणारे देश आहेत. अलिकडच्या वर्षांत, राष्ट्रीय सुरक्षेपासून ते आर्थिक विकासापर्यंतच्या बाबींमध्ये ‘ब्रिक्स’ देश पुढे सरसावले आहेत आणि एकमेकांना पाठिंबा देत आहेत. २०१५ मध्ये, ‘ब्रिक्स’ देशांनी मिळून न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली. तिचे मुख्यालय शांघायमध्ये आहे. या बँकेने अलीकडच्या काळात चीनपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत अनेक मोठ्या प्रकल्पांना निधी दिला आहे आणि हे पैसे डॉलरऐवजी स्थानिक चलनात दिले गेले आहेत. असे प्रयत्न भविष्यात डॉलरला आव्हान देऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी ट्रम्प सज्ज झाले आहेत.वरील धमकी हा याच धास्तीचा परिपाक दिसतोय. आरिफ शेख