काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांकांनी जोरदार जनसंपर्क अभियान राबविले. 2019 च्या लोकसभेपूर्वी उत्तर प्रदेशात त्यांना काँग्रेसच्या प्रभारी करण्यात आले होते. आता सक्रिय सत्ताकारणात पदार्पण करताना वायनाडसारखा मतदारसंघ निवडलेला दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. प्रियांका या राजकारणाला नवख्या नाहीत. ‘‘अमेठी का डंका, बेटी प्रियांका’’ अशा घोषणा काँग्रेसच्या उत्तर प्रदेशामधील कार्यकत्यार्ंंकडून नेहमीच दिल्या गेेलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. प्रियांकांनी मात्र आपण राजकारणात कदापी प्रवेश करणार नाही असे म्हटले होते. पण तरीही उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नेतृत्त्वाची मागणी सातत्याने होताना दिसली. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात प्रियांकांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान राबविले. पण स्वत:ला पडद्यामागे राहणेच पसंत केले. राजकारणातील पहिली अधिकृत एंट्री 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली तेव्हा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रचाराच्या प्रभारी करण्यात आले होते. मात्र त्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली. त्यानंतर 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी खराब राहिली. तेव्हा त्यांच्या टीकाकारांनी प्रियांका गांधींच्या रुपातून काँग्रेसने चुकीचे ‘ट्रम्प कार्ड’ निवडले, अशा शब्दांत उपहास केला होता. आता सक्रिय सत्ताकारणात पदार्पण करताना वायनाडसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडून काँग्रेसने त्यांची वाट सुकर केली आहे. वायनाड काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याचा काहीसा प्रत्यय हा प्रियांका गांधी या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांना आला होता. कारण उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं होतं. अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रियांकांनी रोड शो केला आणि यावेळी जनतेशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘‘ मी गेल्या तीन दशकांपासून प्रचार करत आहे, मात्र यावेळी प्रथमच माझ्यासाठी मत मागत आहे.’’ भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवक नव्या हरिदास या प्रियांकांविरोधात वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. नव्या हरिदास यांचे कुटुंब संघ परिवाराशी निगडीत आहे. 2015 मध्ये केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाने प्रियांकांंना शह देण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील एलडीएङ्गचे उमेदवार सत्यन मोकेरीही रिंगणात आहेत. 2019 च्या निवडणुकीत वायनाड लोकसभेची जागा राहुल गांधी यांनी जिंकली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन जागांवरुन निवडणूक लढविली होती. दोन्ही ठिकाणी विजयानंतर राहुल यांनी रायबरेलीमधील प्रतिनिधीत्वाला पसंती दिली. त्यामुळे वायनाडमध्ये काँग्रेस कुणाला मैदानात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. प्रियांकांचा या मतदारसंघासाठी विचार केला जाईल अशी शक्यताही कुणाला वाटली नव्हती. पण लोकसभेला काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे 2014 पासून गतप्राण झालेल्या पक्षाला चांगलीच धुगधुगी मिळाली आहे. त्याला आणखी बळ देण्यासाठी प्रियांकांना संसदेत पाठवण्याचा निर्णय केल्याचे दिसत आहे. प्रियांका विजयी झाल्यास गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसद भवनात दिसतील. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असून सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्या आहेत. प्रियांका गांधी या लोकसभेत दाखल झाल्यास राहुल यांच्यासमवेत मोदी सरकारला चांगल्या रितीने घेरू शकतात. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रियांकांचे समर्थन करणार्या गटाला ऊर्जा मिळाली आहे. प्रियांका गांधी या प्रबळ इच्छाशक्ती असणार्या आहेत. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’सारखी अनेक अभियान हाती घेतले. या अभियानात त्या राहुल गांधी यांच्यासमवेत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसल्या. 2019 ते 2024 या काळात प्रियांकांची पक्षातील सक्रियता वाढली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. पक्षातून आणि समर्थकांकडून त्यांना निवडणुकीच्या राजकारणात आणण्याची मागणी होऊ लागली. प्रियांकांचे वागणे, बोलणे पाहिल्यावर त्यांची आजी इंदिरा गांधी यांचा भास होतो. प्रियांकांनी मनात आणले असते तर त्या राजकारणात केव्हाच आल्या असत्या; मात्र राहुल यांनी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा दाखवल्यावर प्रियांकांनी आपल्या भावाला साहाय्य करण्याची भूमिका वठवली. स्तुतीपाठकांच्या प्रशंसेला भुलून त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा विचारही मनात आणला नाही. त्यांची वागण्या बोलण्याची शैली इंदिरा गांधी यांच्या शैलीशी साधर्म्य दाखवणारी असली तरी आजीसारखे उपजत नेतृत्व गुण त्यांच्यात असल्याचे प्रत्यक्षरित्या सिद्ध झालेले नाही. इंदिरा गांधी यांना देशाच्या राजकारणाची जबरदस्त आकलन क्षमता होती. आणिबाणीचा निर्णय सोडला तर त्यांचे राजकारणातील सगळे आडाखे, डावपेच यशस्वी ठरले होते. पंडीत नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेसमधील कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष, स.का.पाटील व मोराजी देसाई अशा जेष्ठ मंडळींनी इंदिरा गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. ही तरूण मुलगी आपल्या पुढे काय टिकणार असा समज या जाणत्या मंडळींनी करून घेतला होता. ‘ ‘गुंगी गुडीया’’ अशी हेटाळणी झालेल्या इंदिरा गांधींनी न बोलता अशा काही खेळ्या केल्या की, ही बुजुर्ग मंडळी राजकारणाच्या चौकटी बाहेर ङ्गेकली गेली. असले राजकारण खेळण्याची क्षमता प्रियांका गांधींकडे असल्याचे आजवर तरी दिसून आलेले नाही. आता वायनाडमधील विजयानंतर राहुल यांची ही ‘लाडकी बहीण’ संसदेमध्ये आपल्या आजीप्रमाणे प्रभावी हुकुमत गाजवणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल. भाजपाकडून घराणेशाहीची टीका तर लागलीच झाली आहे; पण येणार्या काळात रॉबर्ट वद्रांचा संदर्भ देऊनही प्रियांकांना लक्ष्य केले जाईल. या टीकांना प्रियांका कशा प्रकारे उत्तर-प्रत्युत्तर देतात हे पहावे लागेल. एकूणच प्रियांकांचे पदार्पण गेमचेंजर ठरते का हे येणारा काळच ठरवेल. – विश्वास सरदेशमुख, ज्येष्ठ पत्रकार