बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब ङ्गाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिथुन यांचे खरे नाव गौरांग होतेे. त्यांनी खूप मेहनत करून नाव आणि संपत्ती कमावले आहे. आज करोडोंमध्ये खेळणार्या मिथुन चक्रवर्तीने कमालीची गरिबी पाहिली आहे. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत त्यांना मुंबईच्या ङ्गूटपाथवर अनेक रात्री रिकाम्या पोटी काढाव्या लागल्या. पण, आपल्या मेहनतीने त्यांनी नशीब बदलले. मिथुनदांनी आतापर्यंत 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1989 मध्ये मिथुनचे 17 चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते आणि हा एक विक्रम म्हणून नोंदवला गेला. बॉलिवूडचा प्रतिष्ठित दादासाहेब ङ्गाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु धर्मेंद्र यांची पिछेहाट झाली आणि सरकारने मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे गेल्या सहा दशकांपासून चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण करणारे धर्मेंद्र यांच्या नावाचा दहा वर्षांत सात वेळेस विचार करण्यात आला. मात्र याही वेळेस त्यांचे नाव शेवटच्या क्षणी मागे पडले. धर्मेंद्र यांच्यानंतर मायानगरीत आलेले अमिताभ बच्चन, रजनीकांत, विनोद खन्ना यांना दादासाहेब ङ्गाळके सन्मान मिळाला आहे. पण निवड मंडळांकडून धर्मेंद्र यांना कमी का लेखले जाते, हे न कळण्यासारखे आहे. मिथुन चक्रवर्ती यांना ङ्गाळके सन्मान मिळणे यात गैर काहीच नाही. ते देखील पाच दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांना आताच सन्मान दिला जात नसेल तर त्यांच्या कामाची दखल कधी घेणार? मिथुन यांचे जीवन संघर्षमय राहिले आणि त्याच्यावर मात करत ते इथपर्यंत पोचले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बॉलिवुडला एकाहून सरस चित्रपट दिले. ‘मृगया’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 1989 मध्ये त्यांनी एका वर्षांत 19 चित्रपट करत ‘लिम्का बुक ऑङ्ग रिकॉर्डस’मध्ये नाव नोंदवले. मिथुन चक्रवर्ती यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे खडतर आयुष्य जगूनही स्वतःच्या हिमतीवर त्यातून बाहेर पडून अभिमानास्पद, सन्मानाने आयुष्य जगता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे सिनेमातील पडद्यावरील नायकाप्रमाणेच ते अनेक तरुणांसाठी रिअल हिरो ठरले. कोलकता येथील वसंत कुमार आणि शांती राणी यांच्या कुटुंबीयात 16 जून 1950 रोजी मिथुनदांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती असे होते. स्कॉटिश कॉलेज, कोलकता येथे विज्ञानाची पदवी घेऊन बाहेर पडलेले गौरांग यांनी तारुण्यावस्थेत पाऊल टाकताच नक्षल चळवळीत सहभाग घेतला. घर सोडून ते कट्टर नक्षलवादी बनले. परंतु हाच तरुण कालांतराने बॉलिवूडचा बेताज बादशहा होईल, याचा विचारही कोणी केला नसेल. मात्र भावाचे निधन झाल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले अणि घरची आर्थिक स्थिती पाहून ते स्वगृही परतले. यादरम्यान, त्यांच्या मनात चित्रपटात काम करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते पुण्याला एङ्गटीआयआयमध्ये शिकण्यासाठी आले. तेथे दिग्दर्शक मृणाल सेन यांनी मिथुन यांना पाहिले आणि त्यांनी ‘मृगया’ चित्रपटासाठी निवड केली. पण चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यासाठी वेळ असल्याने त्यांना मुंबईत काही काळ संघर्ष करावा लागला. ते अनेकवेळा उपाशीपोटी राहिले आणि ङ्गुटपाथवर राहण्याची वेळ आली. 1976 मध्ये ‘मृगया’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटाला नवा चेहरा आणि कलाकार मिळाला. मिथुनदा यांच्या कारकिर्दीला वळण मिळाले ते 1982 च्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने. या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर ते रॉकस्टार बनले आणि त्यांची कीर्ति सातासमुद्रापार रशियापर्यंत पोचली. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्या काळात रशियात राजकपूर यांचा बोलबाला असताना मिथुन देखील तेथे पोचले. ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने त्याकाळात भारतात 6 कोटी रुपये आणि परदेशात 95 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे जगभरात 100 कोटी रुपये कमावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. त्यावेळी, शोले आणि क्रांतीला मागे टाकून सर्वाधिक कमाई करणारा आणि त्या दशकातील बॉलीवूडचा सर्वात हिट चित्रपट राहिला. विशेष म्हणजे ‘डिस्को डान्सर’च्या एक महिनाआधी मायकल जॅकसन यांचा एक अल्बम हिट झाला होता. त्यामुळे मिथुनदांना इंडियन मायकल जॅक्सनही म्हटले ्गेले. मिथुन यांनी आपल्या कारकिर्दीत हिंंदी, बांगला, उरिया, भोजपूरी आणि तमिळ असे एकूण 350 चित्रपटांत काम केले. यामध्ये ‘वारदात’, ‘अविनाश’, ‘जाल’, ‘डिस्को डांसर’, ‘भ्रष्टाचार’,‘घर एक मंदिर’, ‘वतन के रखवाले’, ‘हमसे बढ़कर कौन’, ‘चरणों की सौगंध’, ‘हमसे है जमाना’, ‘बॉक्सर’, ‘बाजी’, ‘कसम पैदा करने वाले की’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘स्वर्ग से सुंदर’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यापैकी दोनशे चित्रपट फ्लॉप झाले किंवा ङ्गार चालले नाहीत. मात्र घर एक मंदिर, प्यार झुकता नही, सुरक्षा, अग्निपथ, हाऊसङ्गुल-2, ओएमजी, गुरू, गोलमाल-3, द कश्मीर ङ्गाइल्स यासारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला चाहत्यांनी दिलखुलास दाद दिली. ‘कसम पैदा करनेवाले की’ हा मिथुन यांचा डायलॉग कमालीचा गाजला. ‘डान्स डान्स’ या चित्रपटांतील गाण्यावर आणि त्यांच्या नृत्यावर देशातील तरुणाई थिरकली. ‘याद आ रहॉ है, तेरा प्यार…’ हे डिस्को डान्सरमधील गाणे आजही डिजेवर वाजविले जाते. यावरून त्यांची लोकप्रियता कळते. कधी काळी त्यांना कमी बजेटच्या चित्रपटांचा ‘अमिताभ’ असेही म्हटले जात होते. ‘मृगया’नंतर त्यांना ताहेदार कथा (1992) आणि स्वामी विवेकानंद (1998) साठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. चित्रपटाच्या अभिनयाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिले आहे. मिथुनदांचे उटी स्टुडिओ आणि हॉटेल व्यवसाय देखील आहे. ते ङ्गेब्रुवारी 2014 मध्ये तृणमुल काँग्रेसकडून राज्यसभेवर निवडून गेले. डिसेंबर 2016 मध्ये त्यांनी राजीनामा देऊन मार्च 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मिथुन यांची पत्नी योगिता बाली या 1970-80 च्या दशकांतील लोकप्रिय अभिनेत्री होत. त्यांना चार मुले असून त्यापैकी दोन मुले मिमोह आणि उष्मय यांनी चित्रपटात काम केले. परंतु त्यांना यश आले नाही. करिअरच्या सुरुवातीला त्वचेच्या रंगामुळे मिथुनदांना खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. एकही अभिनेत्रीला त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास तयार नव्हती. अनेक वेळा चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अभिनेत्रींनी चित्रपट सोडला.बी ग्रेड हिरो म्हणून त्यांची हेटाळणी केली जायची. पण या अभिनेत्याने हार मानली नाही. प्रचंड मेहनत आणि खूप संघर्षानंतर इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. नायिकांकडून नकार मिळण्याच्या काळात अभिनेत्री झीनत अमानने त्यांच्यासोबत ‘तकदीर’ चित्रपटामध्ये काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑङ्गिसवर मिथुन चक्रवर्तीचा आणखी एक यशस्वी चित्रपट ठरला. ‘ तकदीर’नंतर, मी ए-श्रेणीचा अभिनेता बनलो. हे साध्य करण्यासाठी मला मदत केल्याबद्दल मी झीनतजींचा नेहमीच ऋणी राहीन, असे मिथुनदा सांगतात. प्रत्येकजण संघर्षातून जातो, परंतु माझा संघर्ष खूप मोठा होता. कधीकधी मला असे वाटले की मी माझे ध्येय साध्य करू शकणार नाही, मी आत्महत्या करण्याचा विचारही केला होता, असेही ते सांगतात. पण बॉलीवूडचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने आज त्यांना भूतकाळाचे शल्य राहणार नाही.