रशिया व इराण समर्थक बाशर अल असाद याच्या पाच दशकांपासून असणार्या सिरीयातील सत्तेचे झालेले पतन आणि हयात तहरीर अल शामच्या (एचटीएस) नेतृत्वाखाली बंडखोरांनी या देशावर मिळवलेला ताबा हा अमेरिकेसाठी आनंददायी असू शकतो. पण मुख्य चिंता आहे ती सिरीयामध्ये दडवलेल्या रासायनिक आणि जैविक अस्रांची. ती दहशतवाद्यांच्या हाती पडल्यास जगाच्या चिंता वाढणार आहेत. तसेच एचटीएस ही संघटना ही एकेकाळी अल् कायदाची शाखा होती आणि या संघटनेला सिरीयात धार्मिक मूलतत्ववादावर आधारीत शरीया राजवट प्रस्थापित करावयाची आहे. अङ्गगाणिस्तानात तालिबान आणि सिरीयात एचटीएसची राजवट यामुळे कारण यामुळे काश्मीरमधील दहशतवादी संघटना, ज्यांची बांधिलकी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी आहे त्यांच्या कारवायाही वाढण्याची शक्यता आहे. आठ डिसेंबर रोजी सिरीयामध्ये गेल्या 50 वर्षांपासून असणारे बशर अल असाद यांच्या कुटुंबाचे जे साम्राज्य होते ते अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडले. यानिमित्ताने आठवण झाली ती अङ्गगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानच्या ङ्गौजा घुसल्या तेव्हा अमेरिका आणि नाटो त्यांना रोखण्यासाठी कारवाई करतील अशी अपेक्षा होती; पण अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत, पाहता पाहता तालिबानने अङ्गगाणिस्तानची राजधानी काबूलपर्यंत धडक मारली. तशाच पद्धतीने केवळ 12 दिवसांच्या आत एचटीएस म्हणजेच हयात तहरीर अल शाम या दहशतवादी गटाने सिरीयात दमास्कसपर्यंत मजल मारली. यामुळे असादने पलायन केले असून त्याने रशियामध्ये आश्रय घेतला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जागतिक सत्ता आणि विविध संघटना यांच्याकडून अनेक कारवाया सुरू असणार्या सिरीयामध्ये एचटीएसला कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. यानिमित्ताने प्रश्न उभा राहतो तो पाच दशकांपासून असणारे साम्राज्य अचानक कोसळण्याचे कारण काय? सिरीया या देशामध्ये अनेक पंथांचे लोक राहतात. यामध्ये शिया, सुन्नी, मुस्लिम, अलवाईडस् अशा विविध पंथांचा समावेश आहे. याचेे कारण सिरीया हा बहुसांस्कृतिकतावादाचा पुरस्कार करणारा देश आहे. गेल्या 50 वर्षांपासून तिथे असाद यांच्या कुटुंबाची एकाधिकारशाही असली तरी गेल्या 8 वर्षांपासून म्हणजे 2016-17 पासून या देशात यादवी संघर्ष उङ्गाळून आला आहे. बशर अल असाद याला रशिया व इराण या दोन देशांचे भक्कम समर्थन होते. त्यामुळे असादला हटवण्यासाठी सुरू असणार्या संघर्षात अनेक संघटना एकवटल्या होत्या. यामध्ये एचटीएस ही संघटना आघाडीवर होती. याखेरीज अल् कायदा आणि इस्लामिक स्टेट यांचाही असादविरोधी संघर्षात समावेश होता. असादची राजवट ही शियापंथीय होती आणि त्याच्या विरोधातील बंडखोर गट ह सुन्नी पंथिय आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व यापूर्वी इस्लामिक स्टेट आणि अल् कायदानेही केलेले आहे. पश्चिम आशियामध्ये ज्याप्रमाणे शिया पंथीय आणि सुन्नी पंथीय असा पारंपरिक वाद आहे, तशाच प्रकारची स्थिती सिरीयामध्ये होती. परंतु सिरीयामध्ये तब्बल आठ वर्षे असाद या संघटनांशी लढा देत टिकून राहिला. याचे एक कारण रशिया आणि इराणकडून मिळणारे समर्थन हे होते. याखेरीज पश्चिम आशियातील हेजबुल्लाहसारख्या शिया पंथीय संघटनाही असादला मोठे समर्थन देत होती. त्यामुळे असाद हटाव’ या मोहिमेला यश आले नाही. तथापि, गेल्या दोन-तीन वर्षातील घडामोडी असादच्या विरोधात जाणार्या ठरल्या. असादचा पहिला पाठीराखा असणारा रशिया गेल्या अडीच वर्षांपासून युक्रेनयुद्धामध्ये अडकलेला असून ब्लादीमिर पुतीन यांचे संपूर्ण लक्ष या युद्धसंघर्षाकडे आहे. दुसरा पाठीराखा इराण हा इस्राईलविरुद्ध सुरू असणार्या संघर्षात गुंतून पडलेला आहे. तिसरा पाठीराखा असणार्या हिजबुल्लाहचे कंबरडेच इस्राईलने मोडून काढले आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्राईलने केलेल्या घनघोर हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे अनेक कमांडर मारले गेले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेने गेल्या 8 वर्षांपासून सिरीयावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सिरीयाची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. थोडक्यात, असादची चोहूबाजूंनी कोंडी झालेली होती. सिरीयामध्ये असणारे सैन्यही विविध पंथांचे असून त्यंाच्यातही विभागणी झाली आहे. त्यामुळे असादचा बचाव करण्यासाठीची मानसिकताच त्यांच्यात नाहीये. असादकडेही सैन्याला टिकवण्यासाठीचा पैसा नव्हता. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत एचटीएसने संधी साधली आहे. एचटीएस ही संघटना 2011 मध्ये अल् कायदाची शाखा म्हणून स्थापन करण्यात आली होती. काही वर्षे ते अल् कायदाच्या सूचनांनुसार कारवाया करत असत. नंतरच्या काळात त्यांनी अल् कायदापासून ङ्गारकत घेत स्वतंत्र संघटना स्थापन केली. एचटीएसचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर बहुसांस्कृतिकतावादाचा पुरस्कार करणार्या सिरीयामध्ये शरीयाच्या आधारावर इस्लामिक राजवट आणणे आणि शरीया कायद्याची अमलबजावणी करणे. त्यादृष्टिकोनातून ही संघटना प्रयत्न करत होती; अखेरीस त्यांना यश आले आहे. एचटीएसच्या ताब्यात सिरीया गेल्यामुळे जगाच्या चिंता अनेकार्थांनी वाढल्या आहेत. असाद हा रशियाला पळून गेला आहे. यानंतर या बंडखोरांनी सिरीयाची राजधानाही ताब्यात घेतली आहे. 70 टक्क्यांहून अधिक सिरीया त्यांच्या ताब्यात आहे. शीतयुद्ध काळापासून सिरीयामध्ये रशियाने दिलेली महासंहारक रासायनिक शस्रास्रे आहेत. ही शस्रास्रे बंडखोरांच्या हातात पडण्याची भीती आहे. हे बंडखोर सुन्नी पंथीय आहेत आणि त्यांचे पारंपरिक शत्रुत्व इस्राईलबरोबर आहे. इस्राईल आणि सिरीयाची सीमारेषा एकमेकांना भिडलेली आहे. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. त्यामुळे सिरीयातील या घडामोडीमुळे इस्राईलचे धाबे दणाणले आहेत. इस्राईलने जराही विलंब न करता सिरीयामध्ये घुसखोरी केली आहे. इस्राईल आणि सिरीयाच्या सीमारेषेवर 1974 मध्ये एक बङ्गर झोन तयार करण्यात आला होता. या बङ्गर झोनमध्ये इस्राईलच्या ङ्गौजा घुसल्या असून त्यांना या रासायनिक शस्रास्रांचा ताबा घ्यायचा आहे. अन्यथा ती एचटीएसच्या हाती पडतील आणि ती इस्राईलविरोधात वापरली जाऊ शकतात. त्यामुळे इस्राईल याबाबत आक्रमक बनलेला दिसत आहे. एचटीएस ही संघटना पूर्णपणे अल् कायदा, इस्लामिक स्टेट यांच्या उद्दिष्टांनुसार चालणारा आहे. त्यांनी कितीही स्वतःला वेगळे सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची सुरुवातच मुळी अल् कायदाची शाखा म्हणून झाली होती. त्यामुळे अल् कायदाच्या पठडीतून किंवा मुशीतून तयार झालेला हा गट आहे. हा गट सिरीयात सत्तेत येणे याचा अर्थ अल् कायदा आणि इस्लामिक स्टेटचे पुनरुज्जीवन आहे. त्यांना सेङ्ग हेवन सिरीयामध्ये प्राप्त होणार असल्यामुळे जगासाठी ती धोक्याची घंटा आहे. असाद हा रशियासमर्थक असल्याने त्याचे आणि अमेरिकेचे शत्रुत्व जुने आहे. त्यामुळे सिरीयातील घडामोडींनंतर अमेरिकेने यामध्ये राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तात्काळ याबाबत प्रतिक्रिया देताना ही आनंदाची बातमी असल्याचे म्हटले आहे. तथापि, असादच्या पाडावानंतर धार्मिक मूलतत्ववादाने प्रभावित झालेले हे बंडखोर सिरीयामध्ये सत्तेत आले तर ज्या इस्लामिक स्टेट आणि अल् कायदाला संपवण्यासाठी अमेरिकेने आपली ताकद पणाला लावली होती आणि जवळपास दीड-दोन दशके संघर्ष करुन या संघटनांना संपवले होते, त्या संघटनांना वाढण्यासाठी खूप मोठा वाव मिळणार आहे. पश्चिम आशियातील किंवा आखातातील इस्लामिक जगताचे जे राजकारण आहे, तिथे शीतयुद्धकालीन काळापासून ध्रुवीकरण दिसून येते. एकीकडे अमेरिका पुरस्कृत अरब देश आहेत, तर दुसरीकडे शिया पंथीयांचे पाठीराखे इराण व रशिया आहेत. असादच्या माध्यमातून पश्चिम आशियात आपला प्रभाव वाढवण्यास रशिया व इराणला वाव होता. पण असादचाच पाडाव झाल्याने या दोन्ही राष्ट्रांचा आखातातील प्रभाव कमी होणार आहे. भारताच्या दृष्टिकोनातून विचार करता ही निश्चितच चिंतेची बाब आहे. भारताने सिरीयातील घडामोडीनंतर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली असून या देशात शांतता व स्थैर्य असावे, बाह्यशक्तींनी त्यात हस्तक्षेप करु नये असे म्हटले आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत सिरीयासोबतचा भारताचा व्यापार वाढीस लागला होता. अङ्गगाणिस्तानात ज्याप्रमाणे दवाखाने, महाविद्यालये बांधण्यासाठी प्रयत्न केले तशाच प्रकारे सिरीयामध्येही भारत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काही प्रकल्पांमध्ये योगदान देत आहे. दोन्ही देशातील व्यापारही अलीकडील काळात वाढला आहे. अशा वेळी सिरीयात धार्मिक मूलतत्ववादी सरकार आल्यास भारतासाठी अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. आज भारताच्या बाजूला असणार्या अङ्गगाणिस्तानात तालिबानचे शासन कार्यरत आहे. तालिबान, अल् कायदा या सर्वांनी दोन दशकांपूर्वी घातलेला धुमाकूळ जगाने पाहिला आहे. संपूर्ण जगाची ती डोकेदुखी ठरली होती. दुसरीकडे, भारतात जम्मू आणि काश्मीरमध्ये अलीकडील काही महिन्यांमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढीस लागला आहे. 2019 मध्ये केलेल्या काश्मीरच्या पुनर्रचनेनंतर तेथे दहशतवाद काही काळ नियंत्रणात होता. पण अचानक दहशतवादी हल्ले वाढत आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना कार्यरत झाल्या आहेत. भारतातील दहशतवाद हा प्रादेशिक पातळीवरचा नाहीये. भारत पूर्वीपासून ही बाब सांगत आला आहे की, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना या अल् कायदा, इस्लामिक स्टेट यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबरोबर नैसर्गिकरित्या संलग्न आहेत. सिरीयात अल् कायदाच्या समर्थकांचे सरकार सत्तेत येणार असेल आणि अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आश्रय देणारे तालीबान सरकार अङ्गगाणिस्तानात असेल आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असतील तर या सर्वांचा एकत्रित परिणाम भारतासह सर्वच लोकशाही देशांच्या चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे अमेरिका, पश्चिम युरोपियन देश, नाटो यांनी सिरीयातील घडामोडींबाबत राजकारण करता कामा नये. असाद गेल्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा त्याच्या जागी आलेले किती धोकादायक आहेत, याचा विचार करुन त्यांचे नियंत्रण करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक