बहुध्रुवीय जगामध्ये आशिया व आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थसत्तांना मौलिक भूमिका पार पाडावी लागणार आहे. भारत दक्षिणेकडील या नव्या आकांक्षी देशांचे समर्थ नेतृत्व करीत आहे. भारत आणि नायजेरिया हे दोन्ही देश बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुआयामी आहेत. अशा या बहुसांस्कृतिक राष्ट्रांमध्ये मैत्री व सहकार्याचा नवा अध्याय लिहिला जात आहे. नायजेरिया हे या देशाचे नाव तेथे वाहणार्या नायजर या मुख्य नदीच्या नावावरून रूढ झाले आहे. ब्रिटीश वसाहतीमध्ये असताना पत्रकार फ्लोरा शॉ यांनी या भूमीला नायजेरिया नाव दिले. नायजेरिया हे प्रजासत्ताक अटलांटिक महासागराच्या उत्तरेला साहेल आणि दक्षिणेला गिनीचे आखात यांच्यामध्ये वसलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच दिवसांच्या नायजेरिया, ब्राझिल आणि गयाना दौर्यावर आहेत. त्यापैकी त्यांची दोन दिवसांची नायजेरिया भेट महत्त्वपूर्ण ठरली. नायजेरिया लोकसंख्येच्यादृष्टीने आफ्रिकेतील सर्वात मोठा देश. तसेच त्याची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर होती. तेथील चलनाच्या अवमूल्यनामुळे नायजेरिया आता दुसर्या स्थानावर आहे. भूराजनैतिकदृष्टीने त्याचे विशेष स्थान असल्यामुळे या भेटीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. 17 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांनी नायजेरियाला भेट दिली. त्यामुळे आफ्रिका खंडातील देशांशी भक्कम आणि दृढतर मैत्री प्रस्थापित करण्याचा भारताचा संकल्प सिद्धीस जात आहे. ही ऐतिहासिक भेट उभय राष्ट्रातील भागीदारी अधिक भक्कम करणारी ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नायजेरियाला भेट देणारे चौथे भारतीय पंतप्रधान आहेत. त्या आगोदर पंडित जवाहरलाल नेहरून, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती. तसेच सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे 1969 साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसरी यांना ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ हा नायजेरियाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला होता. हा सन्मान नरेंद्र मोदी यांना बहाल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या भाषणातून भारताच्या नवकल्पना आणि आर्थिक विकासाची झेप या मुद्यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला. विकासातील मौलिक योगदान आफ्रिकेतील एक अत्यंत वेगवान प्रगती करणारे राष्ट्र म्हणून नायजेरिया जगाच्या नकाशावर उदयास येत आहे. 125 वर्षापूर्वी तेथे भारतीयांनी पाहिले पाऊल टाकले. आता नायजेरियात सुमारे 60,000 भारतीय नागरिक राहतात आणि त्यांनी नायजेरियाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे 200 भारतीय उद्योग नायजेरियामध्ये प्रस्थापित झाले आहेत. या उद्योगांनी आपल्या बहुमूल्य उत्पादनामुळे नायजेरियाच्या आर्थिक विकासात भर टाकली आहे. नायजेरियन फेडरल सरकारनंतर तेथील तरुणांना रोजगार देणारे भारतीय उद्योग दुसर्या क्रमांकावर आहेत. औषधे, रसायने, हॉटेल आणि अतिथ्य उद्योग तसेच आभियांत्रिकी, शिक्षण, पर्यटन, आरोग्य यासारख्या सेवा उद्योगातसुद्धा भारतीयांनी नायजेरियाच्या विकासात चांगलाच हातभार लावला आहे व तेथील सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा संपादन केली आहे. भागीदारीचे पर्व नायजेरिया देश 1960 साली स्वतंत्र झाला. त्यापूर्वी दोन वर्षापासून भारत-नायजेरिया संबंधास सुरूवात झाली. भारत आणि नायजेरिया दरम्यान आर्थिक विकासातील रचनात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू झाले आहे. भारत-नायजेरिया दरम्यान परस्परातील सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने तीन सामंजस्य करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, सर्वेक्षण सहकार्य आणि सीमाशुल्क निर्धारण सहयोग यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायजेरियातील त्यांचे समकक्ष राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्याशी त्यांनी केलेल्या चर्चेतून फलदायी असे चित्र निर्माण झाले आहे. आजवरच्या परस्पर सहकार्यात भर टाकणार्या नव्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने संरक्षण, प्रगत माहिती तंत्रज्ञान, तसेच आरोग्य आणि शिक्षण या सारख्या क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्याचे अनेकविध प्रकल्प त्यामुळे मार्गी लागणार आहेत. भारत आणि नायजेरियातील धोरणात्मक भागीदारी वाढवून मैत्री नव्या उंचीवर नेण्याच्यादृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. विशेषतः द्विपक्षीय संबंधात परस्पर विकासाची नवी क्षेत्रे अधिक मजबूतपणे उदयास येत आहेत. उभय देशातील व्यापार आयात-निर्यात वाढविण्याच्यादृष्टीने सुद्धा हे एक महत्त्वाचे दमदार पाऊल ठरणार आहे. विशेषतः भारताने ‘अॅक्ट ईस्ट’ हे धोरण जसे भक्कमपणे प्रतीत आणले आहे तसेच गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासासाठी ‘लुक अॅन्ड अॅक्ट इन आफ्रिका’ हा नवा सिद्धांत उदयास येत आहे. राष्ट्रपतींची अल्जेरिया भेट आणि पंतप्रधानांची नायजेरिया भेट यातील सुसंगती लक्षात घेण्यासारखी आहे. आफ्रिकेतील सक्षम देशांकडे भारत मोठ्या अपेक्षेने पहात आहे. कारण त्यांना भारताच्या मदतीची गरज आहे आणि भारतालासुद्धा आपले सामाजिक, आर्थिक, औद्योगिक हितसंबंध जोपासण्यासाठी ही नवस्वतंत्र राष्ट्रे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे नायजेरिया दौर्याची फलश्रुती ही उत्पादक ठरली असे पंतप्रधानांनी केलेले विधान अर्थपूर्ण आणि तेवढेच दूरदृष्टीचे द्योतक आहे. व्यापार वृद्धी, गुंतवणूक आणि मनुष्यबळ विकासाच्यादृष्टीने तसेच रोजगार निर्मितीसाठी आफ्रिका हे एक नवे उभरते क्षेत्र आहे याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत या देशाशी असलेले पारंपरिक मैत्रीचे संबंध अधिक भक्कम करीत आहे. त्यादृष्टीने दक्षिण आफ्रिकेनंतर आता भारताने नायजेरियासारख्या पश्चिम आफ्रिकेतील आणखी एका उभरत्या अर्थव्यवस्थेशी सहकार्याचा हात पुढे केला आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टीक्स म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी मंडळाने चौथ्या तिमाहीत दिलेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या एकूण निर्यातीपैकी नायजेरियाशी केलेली निर्यात 8.68 टक्के एवढी आहे आणि आयातीमध्ये तो चौथा देश असून हे प्रमाण 6.44 टक्के एवढे आहे. याचा अर्थ असा की, निर्यात आणि आयात दोन्हीमध्ये वाढ करण्यासाठी बराच वाव आहे. नायजेरियात 200 भारतीय कंपन्यांची 27 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक गुंतवणूक असून या कंपन्या तेथील राष्ट्रीय विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. व्यापार आणि गुंतवणूक या पलिकडे जाऊन संरक्षण क्षेत्रातील सहकार्याच्याबाबतीत करण्यात आलेला करार ही एक नवी उपलब्धी आहे. भारत-नायजेरिया संबंधातील बदलते परिदृश्य अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः आफ्रिकेतील विकास आकांक्षी देशांशी मैत्री करून व दृढतर संबंध प्रस्थापित करून 21 व्या शतकातील भारत-आफ्रिका संबंध अधिक सुरक्षित करणे हा या दौर्याचा हेतू होता व तो बहुशः सफल झाला आहे असे म्हणावे लागेल. या दौर्यानंतर काढलेल्या संयुक्त पत्रकामध्ये उभय राष्ट्रांनी झिरो टॉलरन्स टेररिझम म्हणजे दहशतवाद, चाचेगिरी उच्चाटन तसेच सागर सुरक्षा इत्यादी बाबतीत समसमान भूमिका प्रकट केली आहे. हिंद प्रशांत क्षेत्र आणि हिंदी महासागरात शांतता व सुरक्षेच्यादृष्टीने दोन्ही राष्ट्रे वचनबद्ध आहेत. सबंध जगामध्ये ऊर्जा संकट सोडविण्यासाठी भारत जसा पुढाकार घेत आहे तसेच दक्षिणेकडील देशांच्या विकास प्रश्नाबाबतसुद्धा नायजेरिया व आफ्रिकन देशाच्या मदतीने एक भक्कम अशी फळी निर्माण करीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यवस्थेत प्रशासकीय सुधारणा करण्यावर भारताचा भर आहे आणि भारताला संयुक्त राष्ट्रसंघात सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे म्हणून आफ्रिकन राष्ट्रे भारताची बाजू भक्कमपणे घेत आहेत. भारताने संयुक्त राष्ट्रसंघात जेव्हा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष घोषणेचा ठराव मांडला तेव्हा त्याला नायजेरियाने पाठिंबा दिला होता ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे जागतिक शांतता व विकासाच्यादृष्टीने भारत जे नवनवे उपक्रम आखत आहे. त्याचे आफ्रिकन देश भक्कमपणे समर्थन करीत आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जी-20 परिषदेमध्ये भारताने आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा संकल्प केला, वर तो पूर्ण केला. तसेच आता ब्रीक्स परिषदेत नायजेरियाच्या प्रवेशासाठी भारताने भक्कम समर्थन देऊ केले आहे. ही बाब सुद्धा परस्पर सहकाराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात भारताने नायजेरियाला मोफत पुरेशी प्रतिबंधक लस पुरवली. तसेच नायजेरियाला औषधे पुरविणारा भारत हा प्रमुख देश आहे आणि नायजेरिया भारताला कच्च्या क्रूड तेलाचा पुरवठा करीत आला आहे. दरवर्षी भारतामध्ये 5000 नायजेरियन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते. बहुध्रुवी जगामध्ये आशिया व आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थसत्तांना मौलिक भूमिका पार पाडावी लागणार आहे. भारत दक्षिणेकडील या नव्या आकांक्षी देशांचे समर्थ नेतृत्व करीत आहे. भारत आणि नायजेरिया हे दोन्ही देश बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुआयामी आहेत. अशा या बहुसांस्कृतिक राष्ट्रांमध्ये मैत्री व सहकार्याचा नवा अध्याय लिहिला जात आहे. शांतता, सुरक्षा आणि लोकशाही मूल्यावरील समान श्रद्धा यामुळे दोन्ही राष्ट्रे अधिक समीप येत आहेत. तेथील भारतीय जनसमुदायाने आजवर त्या राष्ट्राच्या विकासात दिलेले सक्रिय योगदान तेथील लोकांना भूषणावह वाटते. भविष्यकाळात भारत-नायजेरिया मैत्री ही इतर देशांसाठी तेवढीच आदर्श वस्तुपाठ ठरू शकेल. विशेषतः चीनने आफ्रिकन देशामध्ये अलिकडे हस्तक्षेप करून विकासाच्या नावाखाली तेथील अनेक राष्ट्रांना आपल्या कच्छपी आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे भारताने जागरुक होऊन आफ्रिकेतील प्रत्येक राष्ट्राबरोबर केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक व संरक्षण विषयकदृष्टीने सहकार्याची दमदार पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. सर्व 53 आफ्रिकी देशामध्ये भारताने आपल्या वकालती सुरू केल्या आहेत. भारत-नायजेरिया संबंधाचे बदलते परिदृश्य आशादायी आहे, हितसंबंधांचे रक्षण करणारे आहे, तसेच भविष्यकाळाकडे मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने पाहण्यासाठी प्रेरणा देणारे आहे. – प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर