Rupee vs Dollar : भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत आज विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. देशाच्या आर्थिक इतिहासात पहिल्यांदाच रुपयाने ९० रुपये प्रति डॉलरचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. या विक्रमी घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सलग दुसऱ्या दिवशी रुपयामध्ये घसरण दिसून आली. मागील सत्रात ८९.९६ रुपयांवर बंद झालेला रुपया आज ९ पैशांच्या घसरणीसह ९०.०५ वर उघडला. बाजार सुरू होताच रुपयाने ९० चा टप्पा ओलांडला, जो देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या अभूतपूर्व दबावामागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून डॉलरकडे वळत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेण्यास सुरुवात केली आहे. वाढलेली जागतिक अनिश्चितता यामुळे बाजारातील अस्थिरता वाढली आहे. अर्थव्यवस्थेवर वाढता ताण – भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) दर मजबूत असतानाही, रुपयातील ही घसरण महागाई वाढण्याचा धोका अधिक तीव्र करत आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात महाग होते. यामुळे पेट्रोल-डिझेल चे दर वाढण्याची शक्यता. मशिनरी, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची किंमत वाढू शकतात. परदेशात शिक्षण आणि प्रवास करणेही महाग होईल. अमेरिकेने भारतावर लावलेले ५०% शुल्क (Tariff), व्यापार कराराला होणारा विलंब आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीबद्दलच्या वाढत्या चर्चांमुळेही रुपयावरील दबाव वाढला आहे. आरबीआयच्या भूमिकेकडे लक्ष – रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचल्याने, आता सगळ्यांचे लक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे लागले आहे. रुपयातील घसरण थांबवण्यासाठी आरबीआय बाजारात डॉलरची विक्री करून हस्तक्षेप करू शकते. तथापि, तज्ज्ञांच्या मते, सध्या रुपयावर असलेला प्रचंड दबाव पाहता, आरबीआयच्या हस्तक्षेपाचा परिणाम मर्यादित राहण्याची शक्यता आहे. बाजारातील अस्थिरता आणि जागतिक धोरणे जोपर्यंत बदलत नाहीत, तोपर्यंत रुपयावरील दबाव कायम राहू शकतो.