Rupee Vs Dollar: मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि महागाई व आर्थिक मंदीची भीती वाढत आहे. यामुळे सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 39 पैशांनी घसरून 95.23 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. प्रति बॅरल 110 अमेरिकी डॉलरच्या जवळपास असलेले खनिज तेल, भारतासारख्या तेल-आयात करणार्या अर्थव्यवस्थांवर दबाव वाढवित आहे. याशिवाय, वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे परकीय भांडवलाचा परत जात आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 94.95 वर उघडला, त्यानंतर त्यात घसरण झाली आणि अखेरीस तो मागील बंद भावापेक्षा 39 पैशांची घसरण नोंदवून 95.23 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला. डॉलर सावरल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमती ऊच्च पातळीवर स्थिर राहिल्याने भारतीय रुपयाने विक्रमी नीचांक गाठला आहे. तेलाच्या किमतींमधील ही सततची वाढ, भारताच्या व्यापार संतुलनावर आणि व्यापक अर्थव्यवस्थेवर स्पष्ट ताण निर्माण करीत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक, दिलीप परमार म्हणाले, डॉलरची सततची मागणी अल्प मुदतीसाठी रुपयावर दबाव कायम ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान, सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 0.11 टक्क्यांनी वाढून 98.26 वर व्यवहार करत होता. जागतिक तेल बेंचमार्क असलेले ब्रेंट क्रूड वायदे बाजारात 1.37 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 109.65 डॉलरवर व्यवहार करत होते. भाजपचा प बंगालमधील विजय देशांतर्गत मालमत्तेसाठी सकारात्मक ठरेल. तथापि, हा परिणाम अल्पकाळ टिकणारा असण्याची शक्यता आहे. कारण पुरवठा साखळी आणि उद्योगावर होणार्या थेट परिणामामुळे जागतिक भू-राजकारण हाच मुख्य घटक राहील. दरम्यान, खर्च सचिव व्ही. व्हॉलनाम यांनी शुक्रवारी सांगितले की, आगामी काही तिमाही आणि येणारे वर्ष हे अनेक तणावपूर्ण टप्प्यांनी भरलेले असू शकते. त्यामुळे भांडवली खर्च हा खरोखरच प्राधान्याचा विषय असेल.परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी 8,047.86 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशांतर्गत शेअर बाजारात, सेन्सेक्स 355.90 अंकांनी वधारून 77,269.40 वर स्थिरावला, तर निफ्टी 121.75 अंकांनी वाढून 24,119.30 वर पोहोचला.