Rupee Rate: निज तेलाचे दर बरेच कमी झाले आहेत. त्याचबरोबर बँकांनी आणि आयातदारांनी आपल्याकडील डॉलरची विक्री केली. या कारणामुळे गेल्या आठवड्यात कोसळलेला रुपयाचा दर सोमवारी बराच सावरला. चलन बाजारात सोमवारी रुपयाचा दर 46 पैशांनी वाढून 89 रुपये 20 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला होता. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर कमी झाल्यामुळे जास्त डॉलर बाळगणे योग्य होणार नाही असे आयातदारांना आणि बँकांना वाटले. त्यामुळे या संस्थांकडून डॉलरची विक्री झाली. शुक्रवारी रुपयाचा भाव तब्बल 98 पैशांनी कोसळून ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला होता. रिझर्व बँकेने रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न केले असण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात आज खनिज तेलाचे दर 0.78 टक्क्यांनी घसरून 62.07 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले आहेत. ज्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला बराच लाभ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात डॉलरचा दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात कमी झाला. सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सोमवारी 0.02 टक्क्यांनी कमी होऊन 100.15 अंकावर स्थिरावला. अजूनही डॉलर इंडेक्स बराच उच्च पातळीवर असल्यामुळे डॉलरच्या मूल्यावरील परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवारी दुसर्या सत्रात शेअर बाजारात बरीच विक्री झाली. यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. त्याचा परिणाम डॉलरच्या मूल्यावर झाला. परदेशी गुंतवणूकदारांनी 1,766 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. गेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 5.5 अब्ज डॉलरने वाढून 692 अब्ज डॉलरवर गेला आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे भारताकडील सोन्याचे मूल्य वाढल्यामुळे या चलन साठ्यात वाढ झाली असल्याचे समजले जाते.