डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर, नक्की कारण काय? जाणून घ्या

Rupee Hit Record Low: एकीकडे भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू असताना, दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. नुकताच अमेरिकेतील रोजगार डेटा समोर आला आहे. यात अमेरिकेतील बेरोजगारीचा दर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता तुर्तास मावळली आहे. याचा परिणाम भारतीय रुपयाच्या मुल्यावर दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेकडून काही दिवसांपासून रुपयांचे अवमुल्यन केले जात असल्याचेही फॉरेक्स डीलर्सचे म्हणणे आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया किती घसरला?
सोमवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने आतापर्यंतची सर्वात नीचांक पातळी गाठली . डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मुल्य 86.53 वर पोहोचले आहे. गेल्याकाही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने घसरण सुरू आहे.
रुपयाची घसरण नक्की कशामुळे होत आहे?
मजबूत डॉलर, क्रूड ऑइलच्या किमतीत झालेली वाढ आणि विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून मोठ्या प्रमाणात काढून घेतलेला पैसा, ही सर्व रुपयाच्या घसरणीची प्रमुख कारणे आहेत. अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून सावध भूमिका घेतली जात असल्याने डॉलर रुपयाच्या तुलनेत अधिक मजबूत होण्याचे संकेत आहेत.
अमेरिकेतील नोकऱ्यांचा अहवाल अपेक्षापेक्षा अधिक चांगला आला आहे. याशिवाय, बेरोजगारीचा दर 4.2 टक्क्यांवरून 4.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून 2025 मध्ये केवळ 25 बेसिस पॉइंट्स कमी केले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अधिक चांगली वाढ होत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर विदेश गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले जात आहेत. या सर्वांचा थेट परिणाम भारतीय रुपयावर होत आहे.
रुपयाची घसरण सुरूच राहणार का?
पुढील काही दिवस डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मुल्य 85.80 ते 86.50 एवढे राहण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याकडून कोणत्या घोषणा केल्या जातात यावर शेअर बाजार व भारतीय रुपयाची स्थिती अवलंबून असेल.





