मुंबई : अमेरिकेने भारताविरोधात लावलेल्या आयात शुल्काचा नकारात्मक परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रुपयाच्या मूल्यावर गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेला दबाव आजही कायम राहिला. शुक्रवारी भारतीय रुपयाचे मूल्य पंधरा पैशांनी कोसळून 88.27 रुपये प्रति डॉलर या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेले. डॉलरची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून परकीय गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यातच अमेरिका पुन्हा भारतावर काही प्रमाणात शुल्क आकारण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येत असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने खनिज तेलाच्या किमती सध्या माफक पातळीवर आहेत. त्यामुळे रुपयाच्या मूल्यात माफक घसरण होत आहे, असे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले. काही विश्लेषकांनी सांगितले की, काही वृत्त माध्यमांमध्ये अमेरिका भारतातील माहिती तंत्रज्ञान सेवावर आयात शुल्क लावणार असल्याची बातमी फिरत होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव बर्याच प्रमाणात कमी झाला. मात्र दुपारी अमेरिकन प्रशासनाने भारतातील माहिती तंत्रज्ञानावर अधिक आयात शुल्क लावण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यानंतर रुपयाच्या मूल्यात बरीच सुधारणा झाली. विशेष म्हणजे इतर सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स कमकुवत होऊन 98.3 अंकावर आला. मात्र तरीही डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पिछाडीवर राहिले. दरम्यानच्या काळामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांकही काही प्रमाणात कमी झाले. अशा परिस्थितीत रुपयाला आधार मिळाला नाही. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 106 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.