मुंबई – जागतिक आर्थिक आणि भूराजकीय परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यात रुपयाचे बरेच अवमूल्यन झाले आहे. गुरुवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी कोसळून 88 रुपये 71 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. चलन बाजारात रिझर्व बँक शक्यतो हस्तक्षेप करत नाही. सध्याचे रुपयाचे अवमूल्यन डॉलरची मागणी वाढल्यामुळे होत आहे, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नमूद केले. भारताकडे परकीय गंगाजळीचा जवळजवळ 600 अब्ज डॉलर इतका साठा आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आयातीसाठी कसलीही अडचण दीघ पल्ल्यात जाणवणार नाही, असेही मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे बोलताना मल्होत्रा यांनी सांगितले की, लवकरच अमेरिकेबरोबर संतुलित व्यापार करार होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय रुपयावरील दबाव कमी होईल. अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे आणि भूराजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर डॉलरची मागणी वाढत आहे. त्या तुलनेत रुपयाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे चलन बाजारातील नियमानुसार डॉलर वधाारत आहे व रुपया घसरत आहे. रुपयाचे मूल्य नेमके कोणत्या पातळीवर असावे असे आम्ही कसलेही उद्दिष्ट ठरविलेले नाही, या मताचा मल्होत्रा यांनी पुनरुचार केला. चलन बाजारातील व्यापार्यांनी या घडामोडी बाबत सांगितले की, अमेरिकेत महागाई वाढल्यामुळे फेडरल रिझर्वचे अधिकारी व्याजदर कपात शक्य नसल्याचे म्हणत आहे. त्यामुळे इतर चलनाच्या तुलनेत डॉलर वधारत असून आता सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 100 अंकापर्यंत गेला आहे. भारतीय बँकाबाबत बोलताना मल्होत्रा यांनी सांगितले की, भारतातील बँकांनी गेल्या आठ वर्षात इतकी उत्तम कामगिरी केली आहे की, बँकांचा नफा विक्रमी पातळीवर गेला आहे. लवकरच भारतातील काही बँका जगातील सर्वात मोठ्या 100 बँकांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता वाढली आहे.