मुंबई – रुपयाचे मूल्य बर्याच प्रमाणात घसरूनही रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर शुक्रवारी रुपयाचे मूल्य कालच्या तुलनेत पाच पैशांनी कमी होऊन 89.94 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. रिझर्व बँकेने भांडवल सुलभता मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या उपाययोजना केल्यामुळे रुपयाच्या मूल्यात जास्त घसरण झाली नसल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. सकाळी रुपयाचा भाव 20 पैशांनी वधारला होता. पतधोरण जाहीर झाल्यानंतर तो दिवसाखेर पाच पैशांनी कमी झाला. ही घट मर्यादित असल्याचे दिसून येते. 2025 या वर्षात आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. एकूण आयात- निर्यातीच्या आकडेवारीनुसार रुपयाचे आणखी दोन ते तीन टक्के अवमूल्यन झाले तरी रिझर्व बँक आणि अर्थमंत्रालय त्याकडे दुर्लक्ष करणार असल्याचे समजले जाऊ लागले आहे. त्यामुळे सध्याच्या जागतिक व्यापार युद्धाच्या परिस्थितीत भारतीय निर्यातदारांना निर्यात करणे अधिक सुलभ होईल असे समजले जात आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात अमेरिकेचे फेडरल रिझर्व निश्चितपणे व्याजदरात कपात करणार असल्यामुळे जगातील इतर मुख्य सात चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स एकतर्फी कमी होत आहे. शुक्रवारी हा इंडेक्स 0.03 टक्क्यांनी कमी होऊन 98.96 अंकावर आला आहे. वर्षाच्या सुरुवातीला हा इंडेक्स 110 अंकावर होता. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत दीर्घ पल्ल्यात रुपया फारसा घसरणारा नसल्याचे समजले जात आहे. खनिज तेलाचे दारही माफक पातळीवर आहेत. फक्त परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या विक्रीचा प्रश्न आहे. अमेरिकेतील व्याजदर कपातीनंतर तो काही प्रमाणात सुटू शकेल असे समजले जात आहे. रुपयाचे निश्चित मूल्य ठरविलेले नाही; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्लोत्रा यांचा पुनरुच्चार – डॉलर किंवा इतर चलनाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य नेमके किती असावे हे ठरविण्याचे रिझर्व बँकेचे धोरण नाही. चलन बाजारातील विविध घटनाक्रमानुसार रुपयाचे मूल्य निश्चित होत असते या मताचा रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पुनरुच्चार केला आहे. गेल्या आठवड्यात रुपयाचे मूल्य 90 रुपये प्रति डॉलरपेक्षा कमी झाल्यानंतर या विषयावर जोरदार परस्परविरोधी चर्चा चालू असताना मल्होत्रा यांनी या विषयावर व्यक्तव्य केले आहे. इतर बाजाराप्रमाणे चलन बाजार कार्यक्षमरीत्या काम करीत असतो. चलन बाजारात दीर्घ पल्ल्यात विविध चलनाचे मूल्य आपले योग्य स्थान निर्माण करत असते. या मतप्रवाहावर आपला ठाम विश्वास असल्याचे मल्होत्रा यांनी नमूद केले. विविध घटनाक्रमामुळे चलन बाजारात अस्थिरता असते. मात्र अस्थिरता जास्तच निर्माण झाल्यानंतर आयातदारांना आणि निर्यातदारांना त्याचा जास्त त्रास होऊ नये यासाठी ही अस्थिरता कमी करण्यासाठी रिझर्व बँक वेळोवेळी कमी -अधिक प्रमाणात हस्तक्षेप करत असते. आमची भूमिका तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे. दीर्घ पल्ल्यात चलनाचा दर किती असावा हे आमच्यापेक्षा बाजारच ठरवू शकतो असे आमचे मत आहे असे त्यांनी सांगितले. रुपयाचे मूल्य बदलण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पत धोरणात कसल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मात्र भांडवल सुलभता वाढविण्यासाठी रिझर्व बँकेत बरेच प्रयत्न केले असल्याचे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, रुपयाच्या अवमूल्यनाची फारशी चिंता करण्याची गरज नाही. देशाकडे परकीय चलनाचा पुरेसा साठा आहे. चालू खात्यावरील तुट नियंत्रणात आहे. स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे आगामी काळात देशातील शेअर, रोखे बाजारात परकीय गुंतवणूक घेण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होणार आहे. भारताकडे सध्या 686.2 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे. हा परकीय चलन साठा भारताला 11 महिन्याच्या आयातीसाठी पुरेसा आहे. 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत केवळ 0.77 अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून घेतली असल्याची माहिती देण्यात आली.