मुंबई – भारत- अमेरिका कराराबाबत स्पष्ट संकेत मिळत नाहीत. रिझर्व बँकेकडून रुपयाला सावरण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालू आहे. आयातदाराकडून डॉलरची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रुपयाचे मूल्य बुधवारी 25 पैशांनी कोसळून 90.21 रुपये प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेले. विशेष म्हणजे जगातील इतर मुख्य 6 चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 0.20% कमी होऊन 99.16 अंकावर आहे. त्यामुळे रुपयाची जास्त हानी झाली नाही. अन्यथा रुपयाचा भाव आणखी कोसळला असता असे समजले जाते. लवकरच अमेरिकेत व्याजदर कपात होणार आहे. अशा परिस्थितीत डॉलर इंडेक्स आणखी कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुपयाला मर्यादित प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता आहे. या कारणामुळे रुपयाच्या अवमूल्यनाकडे अर्थ मंत्रालय दुर्लक्ष करीत असल्याचेही समजले जाते. रुपयाचे वेगाने अवमूल्यन होण्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर विक्रीचा महत्त्वाचा वाटा असल्याचे समजले जाते. गेल्या महिन्यात या गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केल्या नंतर नोव्हेंबरमध्ये गेल्या तीन दिवसापासून या गुंतवणूकदारांची विक्री चालूच आहे. मंगळवारी या गुंतवणूकदाराने तब्बल 3,642 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. ही तूट देशातील गुंतवणूकदार भरून काढत आहेत. मात्र डॉलर देशाबाहेर जात असल्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत आहे. अवमूल्यनाकडे ठरवून दुर्लक्ष – दरम्यान रुपया एकतर्फी कोसळत आहे. अशा परिस्थितीत आयात महागात पडणार असल्यामुळे देशात आयात केलेल्या वस्तूची महागाई वाढणार आहे. असे असूनही रिझर्व बँक हस्तक्षेप करणे टाळीत आहे. याचा अर्थ निर्यात वाढावी याकरिता सध्याच्या परिस्थितीत रुपयाचे मूल्य ठरवून कमी होऊ दिले जात असल्याचे मत काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत. रुपयाचे अवमूल्यन चिंतेचे कारण नाही- नागेश्वरन 2025 या वर्षात आतापर्यंत रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे महागाईची आयात होत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असे समजले जाते. मात्र अर्थ मंत्रालयाचे सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी रुपयाचे सध्याचे घसरत असलेले मूल्य चिंतेचे फारसे कारण नाही असे स्पष्ट केले आहे. भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी रुपयाच्या अवमूल्यनाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे रुपयाच्या अवमूल्यनामुळे देशातील महागाईवर नकारात्मक परिणाम होणार नाही. त्याचबरोबर निर्यातीवरही याचा परिणाम होणार नाही असे आपल्याला वाटते. त्यामुळे सध्या तरी सरकारच्या दृष्टिकोनातून हा फारसा चिंतेचा विषय नाही. विशेष म्हणजे 2025 मध्ये रुपयाचे मूल्य आतापर्यंत पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आणखी होणार्या अवमूल्यनाकडेही सरकार दुर्लक्ष करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. ते म्हणाले की, पुढील वर्षी रुपयाचे मूल्य योग्य पातळीवर स्थिर होईल. नागेश्वरान यांच्या या वक्तव्याचा अर्थ असा घेतला जात आहे की, रुपयाचे मूल्य सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर आहे आणि सरकारलाच हे मूल्य कमी करायचे आहे. सरकारच्या दृष्टिकोनातून रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर योग्य असेल हे मात्र त्यांनी नमूद केले नाही. भारताची निर्यात घसरत असल्यामुळे रुपयाचे मूल्य घसरल्यास निर्यातदारांना याचा काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. मात्र आयात महाग होते. किरकोळ किमतीवरील महागाई कमी असल्यामुळे सरकार रुपयाच्या अवमूल्यनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही समजले जाते. मात्र यामुळे पुढील आठवड्यात रिझर्व बँक व्याजदरात कपात करेल की नाही याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. रुपयाच्या प्रारब्धात आणखी अवमूल्यन अटळ; निर्यात वाढविण्यात अपयश येत असल्याचा परिणाम – रुपयाचे मूल्य बुधवारी 90 रुपये प्रति डॉलरपेक्षा जास्त घसरले आहे आणि आगामी काळात रुपयाचे मूल्य या पातळीपेक्षा जास्त बळकट होण्याची शक्यता मंदावली आहे. रुपयाच्या प्रारब्धात आणखी अवमूल्यन अटळ असल्याचे मत वित्तीय सेवा क्षेत्रातील वरिष्ठ विश्लेषक व्यक्त करीत आहेत. कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाचे प्रमुख निलेश शाह यांनी सांगितले की, भारत ज्या देशांबरोबर व्यापार करतो त्या देशांबरोबरचा व्यापार असंतुलित होत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे आणि येत राहणार आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य असलेले शाह यांनी असे सांगितले की, रुपया घसरत राहणार आहे. कारण आपण ज्यांच्याबरोबर व्यापार करतो त्या देशातील महागाईपेक्षा आपल्या देशातील महागाई जास्त आहे. त्याचबरोबर भागीदार देशातील उत्पादकतेपेक्षा आपली उत्पादकता कमी आहे. अशा परिस्थितीत आपले चलन त्यांच्यापेक्षा बळकट होणे अशक्य आहे. व्यापारातील आपले असंतुलन पाहिले असता 2025 मध्ये रुपयाचे पाच टक्के अवमूल्यन झाले आहे. आणखी दोन ते तीन टक्के अवमूल्यन होणे अटळ आहे. काही प्रमाणात रुपया लघु पल्ल्यात कमी -जास्त झाला तरी दीर्घ पल्ल्यात मात्र रुपयाचे अवमुल्यन होणे अटळ आहे. आपली उत्पादकता कमी आणि महागाई जास्त असेल तर निर्यात वाढविण्यासाठी चलनाचे अवमूल्यन गरजेचे असते या बाबीकडे त्यांनी वेधले. रिझर्व बँकेचे परिस्थितीकडे लक्ष नाही असे म्हणता येणार नाही. रिझर्व बँकेने लघु पल्ल्यातील अस्थिरता कमी करण्यासाठी योग्य तो हस्तक्षेप केला आहे, असे रिझर्व बँकेच्या आकडेवारीवरून दिसते. मात्र एकूण परिस्थिती पाहता रुपयाचे मूल्य बाजार ठरवेल ही रिझर्व बँकेची भूमिका योग्य आहे, असे ते म्हणाले. भारत -अमेरिकेदरम्यान व्यापार करार झाला तरी रुपयाचे मूल्य सध्याच्या पातळीपेक्षा जास्त सुधारणार नाही. भारताने शेजारी देशातील गुंतवणूक रोखण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.