Rupee Vs Dollar : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढल्याने त्याचे थेट पडसाद भारतीय चलन बाजारात उमटले आहेत. सलग दोन दिवस वधारल्यानंतर, शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी घसरून ९४.४७ वर बंद झाला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ताज्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. आंतरबँकीय परकीय चलन बाजारात रुपया आज सकाळी ९४.५८ वर उघडला होता. व्यवहारादरम्यान त्याने ९४.६८ पर्यंत नीचांकी पातळी गाठली होती, मात्र सत्राअखेर तो ९४.४७ वर स्थिरावला. अमेरिकेने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून होर्मुझची सामुद्रधुनी आणि नागरी वस्त्यांवर नवे हल्ले केल्याचा आरोप इराणने केला आहे. याउलट, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी अद्याप लागू असल्याचा दावा केल्याने जागतिक स्तरावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर पोहोचले आहेत. Rupee Vs Dollar : रुपया 25 पैशांनी घसरून 94.47 च्या पातळीवर; पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम मिरे अॅसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांच्या मते, आखातातील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ रुपयावर दबाव निर्माण करत आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) होत असलेली सातत्यपूर्ण विक्री देखील रुपयाच्या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. आगामी काळात रुपया ९४.१० ते ९४.९० या मर्यादेत व्यवहार करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. (Rupee Vs Dollar) देशांतर्गत शेअर बाजारातही आज मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ५१६ अंकांनी घसरून ७७,३२८ वर बंद झाला, तर ‘निफ्टी’ १५० अंकांच्या घसरणीसह २४,१७६ वर स्थिरावला. आखातात इराण आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या ताज्या चकमकींमुळे जागतिक बाजारपेठेतील जोखीम वाढली असून, आगामी काळात याचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवण्याची चिन्हे आहेत. (Rupee Vs Dollar)