Rupee – Dollar: इराण -अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर भारताला महाग खनिज तेल आयात करण्याबरोबरच निर्यातीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत भारताची चालू खात्यावरील तूट वाढवून दोन टक्क्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे रुपयाचा भाव या कालावधीत चार टक्क्यांनी कमी झाला आहे. रुपयाचा भाव 27 फेब्रुवारी रोजी 91.02 रुपये प्रति डॉलर होता. तो आता चार टक्क्यांनी कमी होऊन 94.75 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला आहे. त्यामुळे भारताला आयात महागात पडणार आहे. इंधनाच्या किमती वाढविल्यामुळे देशांतर्गत वाहतूक खर्च वाढून महागाई वाढणार आहे. अशा परिस्थितीत एकूणच महागाई जर जास्त प्रमाणात वाढली तर रिझर्व बँकेला नजीकच्या भविष्यात व्याजदर वाढीच्या शक्यतेवर विचार करावा लागेल असे समजले जाऊ लागले आहे. दरम्यान अधिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे डॉलर इंडेक्स या एका महिन्यामध्ये 2.7 टक्क्यांनी वाढवून जवळजवळ 100 अंकावर गेला आहे.