Rupee Vs Dollar : रुपयाला सावरण्यासाठी RBI मैदानात; डॉलरसमोर 96 ची पातळी निर्णायक
Rupee Vs Dollar : रुपया डॉलरच्या तुलनेत 96 रुपयांच्या आसपास स्थिरावला. RBI चा हस्तक्षेप, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि अमेरिका-इराण चर्चेच्या शक्यतेचा रुपयावर परिणाम जाणून घ्या.

Rupee Vs Dollar : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे आणि अमेरिका-इराण यांच्यात चर्चेची शक्यता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा रुपयाला आधार मिळाला. मंगळवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 96 रुपयांच्या महत्त्वाच्या पातळीच्या आसपास स्थिर राहिला.
आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 96.03 वर उघडला. त्यानंतर तो घसरून 96.15 या दिवसातील नीचांकी पातळीवर पोहोचला. अखेरीस तो मागील बंद भावाच्या तुलनेत 2 पैशांनी मजबूत होऊन 95.95 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला.
चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, स्थानिक आयातदारांकडून डॉलरची मागणी आणि डॉलरची वाढलेली ताकद यामुळे रुपयाची वाढ मर्यादित राहिली. रुपया 96 च्या आसपास पोहोचल्यास आरबीआयकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याचेही बाजारातील सूत्रांनी सांगितले.
सोमवारी रुपया दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा 96 रुपयांची पातळी ओलांडून 95.97 वर बंद झाला होता. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, मजबूत डॉलर आणि अमेरिकी रोखे परताव्यातील वाढ यामुळे रुपयावर दबाव राहण्याची शक्यता आहे. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थांमार्फत चर्चा होण्याच्या शक्यतेमुळे तेलाच्या किमती कमी झाल्यास रुपयाला आधार मिळू शकतो.
दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 0.24 टक्क्यांनी वाढून 101.44 वर पोहोचला. ब्रेंट कच्चे तेल 0.40 टक्क्यांनी घसरून 106.86 डॉलर प्रति बॅरलवर आले.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारातून 5,353.22 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
दरम्यान, उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताचे औद्योगिक उत्पादन ऑगस्टमध्ये 8 टक्क्यांनी वाढले. जुलैमध्ये ही वाढ 7.4 टक्के होती.





