Dollar Vs Rupees: वाढते कच्चे तेलाचे दर, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि मजबूत डॉलर यामुळे रुपयावर बुधवारी प्रचंड दबाव दिसून आला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसभरातील व्यवहारात विक्रमी ९५.८० या नीचांकी पातळीवर घसरला. अखेरीस तो ९५.६७ या सर्वकालीन नीचांकी बंद पातळीच्या जवळ स्थिरावला. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया ९५.५२ वर उघडला. मंगळवारी रुपया ९५.६८ या विक्रमी नीचांकी स्तरावर बंद झाला होता. दिवसातील चढ-उतारांमध्ये रुपया ९५.५१ ते ९५.८० या दरम्यान व्यवहार करत होता. (Dollar Vs Rupees) विदेशी चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीमुळे रुपयावर दबाव कायम आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेचा संभाव्य हस्तक्षेप आणि सोन्यावरील आयात शुल्कवाढीमुळे घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली. तज्ज्ञांचे मत – (Dollar Vs Rupees) कोटक सिक्युरिटीजचे कमॉडिटी आणि करन्सी रिसर्च प्रमुख अनिंद्य बॅनर्जी म्हणाले, “कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. आरबीआयचा हस्तक्षेप आणि सोन्याच्या आयातीवरील निर्बंधामुळे काहीसा आधार मिळू शकतो. पुढील काळात रुपयाची दिशा मुख्यतः कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर अवलंबून राहील.” हेही वाचा – सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद केंद्र सरकारने नुकतेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंची आयात कमी होऊन परकीय चलन साठ्यावरचा ताण घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Dollar Vs Rupees: रुपया आणखी पातळ झाला; डॉलरच्या तुलनेत 95.80 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर; 95.67 वर स्थिरावला दरम्यान, डॉलर निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी वाढून ९८.५१ वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर १०७.३० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास स्थिर होता. मिराए अॅसेट शेअरखानचे विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले की, “कच्च्या तेलाचे वाढते दर, महागाईची चिंता आणि अमेरिका-इराण तणावामुळे रुपया दबावाखाली राहू शकतो. मात्र, आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे खालच्या स्तरावर आधार मिळण्याची शक्यता आहे.” शेअर बाजारात किरकोळ वाढ – (Dollar Vs Rupees) देशांतर्गत शेअर बाजारात सेन्सेक्स ४९.७४ अंकांनी वाढून ७४,६०८.९८ वर, तर निफ्टी ३३.०५ अंकांच्या वाढीसह २३,४१२.६० वर बंद झाला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी १,९५९.३९ कोटी रुपयांची विक्री केली. दरम्यान, एप्रिलमधील किरकोळ महागाई दर ३.४८ टक्क्यांवर पोहोचल्याची आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. खाद्यपदार्थ आणि मौल्यवान धातूंच्या वाढत्या किमतींमुळे महागाईत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.