Rupali Patil : गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात वक्तव्य करताहेत. अशात भुजबळ यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होताना पाहायला मिळाली होती. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केल होत. गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला नेत्याने मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून संजय गायकवाड यांना हाकलून द्यावं अशी मागणी करत जळजळीत टीका केली आहे. छगन भुजबळ हे सातत्याने ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसताहेत. मराठा समजला ओबीसींमधून आरक्षण न देण्याची भूमिका भुजबळांनी याआधी देखील स्पष्ट केली आहे. अशात शिंदे गटातील काही नेत्यांनी भुजबळांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. यादरम्यान संजय गायकवाड यांनी भुजबळांविरोधात बोलताना आक्रमक भूमिका घेतली. अशात आता राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) देखील संजय गायकवाड यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी गायकवाड यांच्यावर टीका करत त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. “संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखलं पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला कार्यकर्ते खंबीर आहेत. छगन भुजबळ हे कशाला पाहिजे? तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल. तू आमदार तुझ्या घरी, बोलताना नीट बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल” असा घणाघात रुपाली पाटील यांनी केला आहे. “जर संजय गायकवाड यांनी शिव्या दिल्या तर डबल शिव्या द्या” असंही रुपाली पाटील यावेळी म्हणाल्या. काय म्हणाले होते संजय गायकवाड नेमकं ? एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही, असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय.