Rupali Chakankar : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावर महिला आयोगाच्या कारभारावर टीका करण्यात आली होती. महिला आयोगाचे अध्यक्षपद शोभेचा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका करण्यात आली होती. यामुळे महिला आयोगाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या ना त्या कारणामुळे महिला आयोग चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. यावर अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मौन सोडलं आहे. तसेच टीका करणाऱ्या विरोधकांना एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे. आज कुठल्याही प्रकरणात महिला आयोगाला ओढले जातेय. हीच माझ्या कामाची पावती असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरसह विदर्भातील काही शहरांमध्ये महिला आयोगाच्यावतीने जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चाकणकर या नागपूरमध्ये आल्या असता त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच हगवणे प्रकरणात माझ्यावर वैयक्तिक व आयोगावर आरोप करणाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर सर्वांनी माफी मागितली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं. एका वृत्तसमूहाच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी जबाबदारी सोपवली तेव्हा मी नाराज झाली होते. पुढं जाऊन आयोगाच्या माध्यमातून हजारो महिलांना न्याय देता असल्याने आपली नाराजी नाही उलट आपण समाधानी असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं. चार वर्षांच्या कार्यकाळात 35 ते 36 हजार तक्रारी निकाली काढल्या. अनेकांचे उध्वस्त होणारे संसार वाचविता आले. महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायालयामार्फत फाशी तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावता आली. याचेही समाधान आहे, असंही चाकणकर म्हणाल्या. महिला आयोगावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, आयोगाला न्यायालयाप्रमाणेच काम करावे लागते. निवाडा द्यावा लागतो. महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरणे आयोगाकडे येतात. त्यामुळे नावे गुप्त ठेवावी लागते. हेही वाचा : देहरादूनमध्ये ढगफुटी ; अनेक हॉटेल्स आणि दुकानं मोठ्या ढिगाऱ्या खाली, नैनितालमध्ये शाळांना सुट्टी जाहीर