पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित होते त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना थेट निधी वाटपावरुन लक्ष्य केलं. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी, अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका करताना, गुलाबी रंगावरुन त्यांना डिवचलं. आता, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केली. काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? घराच्या समोरील रस्ता बनवू न शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळं गुलाबी स्वप्नांवर ही शब्द न काढलेले बरे. तुमची लोकसभेची सूज विधानसभेत उतरवू, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर पलटवार केला आहे. काय म्हणाले होते अमोल कोल्हे? अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून लाडकी बहीण योजना आणि अजित पवारांचं गुलाबी जॅकेट यावरुन महायुती सरकारवर टीका केली. 1500 रुपयांमध्ये बहुमूल्य मत विकू नका. आता लाडका दादा योजना आणलीये. युवकांना स्टाय पेंड दिले जाणार आहेत. मात्र, ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे. मग त्यापुढं काय? त्यामुळं स्टायफंड पेक्षा पर्मनंट नोकरी बद्दल युवकांनी विचार करायला हवा, असे कोल्हेंनी म्हटलं होतं. तसेच, काहींनी पिंक कलरला पसंती दिलीय, असे म्हणत जयपूरचा दाखलाही त्यांनी दिला होता.