‘यामुळे’ रुपाली चाकणकर यांनी दिला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई – राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे. त्यांनी आज मुंबईत आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष आणि महिला आयोग अध्यक्ष अशा दोन्ही जबाबदाऱ्या आहे. यामुळे रुपाली चाकणकर यांनी “एक व्यक्ती, एक पद’ यानुसार राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
पक्षाने जी जबाबदारी दिली ती चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला. या संघटनेच्या कामाची पावती म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले. सामान्य कार्यकर्त्याला आयोगाचे अध्यक्षपद देऊन जो काही सन्मान दिला त्याबद्दल आभारी आहे. राज्य महिला आयोगाचे पद हे संवैधिनिक पद आहे. या पदावर निपक्षपाती काम करणं अपेक्षित असतं म्हणून राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा देते, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचे काम रुपाली चाकणकर पाहत होत्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर या पदाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांना देण्यात आली होती.





