Rupali Chakankar : “माझे पात्र चित्रपटात….”; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’च्या ट्रेलरनंतर रुपाली चाकणकर संतापल्या
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून, कुटुंबीयांनाही जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला.

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून, कुटुंबीयांनाही जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला. अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
चाकणकर म्हणाल्या, “माझी मुले शैक्षणिक क्षेत्रात असूनही त्यांच्याविषयीही निराधार आरोप करण्यात आले. आशा मिरगे यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत.”
दिल्ली उच्च न्यायालयातही आपण याचिका दाखल केली असून, त्यामध्ये रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आपण १० जुलै रोजी स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही यूट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटासंदर्भात बोलताना चाकणकर म्हणाल्या, “हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. एखाद्या व्यक्तीवर आधारित पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते. माझी कोणतीही परवानगी न घेता माझे पात्र चित्रपटात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांविरोधातही कायदेशीर पावले उचलली जातील.”
दरम्यान, नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद दिसणार असल्याची झलक टीझरमधून समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.
अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यातील काही राजकीय, प्रशासकीय आणि अन्य क्षेत्रांतील व्यक्तींची नावे चर्चेत आली होती. त्याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. या वादानंतर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी सातत्याने सर्व आरोप फेटाळत न्यायालयीन मार्ग स्वीकारला आहे.





