Rupalekha Dhore has passed away : महाराष्ट्राच्या राजकारणात आज दुहेरी शोकाची लाट पसरली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात (२८ जानेवारी) निधन झाले, तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील पहिल्या महिला आमदार रुपलेखा खंडेराव ऊर्फ दादासाहेब ढोरे (वय ७६) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. या दोन्ही घटनांमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात गहिरा शोक पसरला आहे. मावळ तालुक्यातील पहिल्या महिला आमदार रुपलेखा ढोरे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. १९९३ ते १९९५ या कालावधीत त्यांनी मावळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण मिळाले. त्या आणि त्यांचे पती खंडेराव ढोरे यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदनशेठ बाफना यांचा पराभव करून मोठा धक्का दिला. या विजयासह रुपलेखा ढोरे मावळ तालुक्यातील पहिल्या महिला आमदार आणि भाजपच्या पहिल्या आमदार ठरल्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, पुतणे आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी Ruplekha Dhore अजित पवार यांचा अपघात बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झाला. मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेल्या खासगी विमानात अजित पवार यांच्यासह ५ जण होते, ज्यात सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आज बारामती आणि मावळ येथे शोकाचे वातावरण आहे. दोघांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना मनापासून संवेदना.