प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेची प्रभाग रचना फुटल्याची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर भेटीसाठी गेल्याच्या अफवेने विरोधकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर काही जणांनी त्या भागात आपले कार्यकर्तेही पाठविले. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच निघाल्याने भाजपला घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांचा चांगलाच हिरमोड झाला. असा झाला गोंधळ.. शुक्रवारी दिवसभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावली. त्यानंतर यशदा येथे संध्याकाळी पुणे महानगर ग्रोथ हबच्या बैठक होती. बैठकीनंतर ते कोथरूडला जाणार होते. त्यामुळे यशदाचा कार्यक्रम संपल्यानंतर फडणवीस यांचा ताफा गणेशखिंड रस्त्याने निघाला. मात्र, पुढे इस्काॅन मंदिरापासून या गाड्या माॅडेल काॅलनीकडे वळाल्या. याच रस्त्यावर महापालिका आयुक्तांचाही बंगला आहे. अचानक हा ताफा आतमध्ये वळल्याने काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या माजी नगरसेवकांना याची माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री प्रभाग रचनेत हस्तक्षेप करण्यासाठी आयुक्त बंगल्यावर गेल्याची अफवा पसरली. २०१७ च्या प्रभाग रचनेच्या वेळी प्रारूप प्रभाग रचना सादर करण्याच्या काही दिवस आधीच भाजपचे पदाधिकारी आयुक्त बंगल्यातून बाहेर पडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे असाच ही प्रकार असेल, असा समज करून घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माॅडेल काॅलनीमधील लकाकी तलावासमोर असलेल्या एका बड्या उद्योगपतीच्या घरी भेटीसाठी गेले होते. तेथे काही वेळ थांबून ते कोथरूडकडे निघून गेले. त्यामुळे विरोधकांचा चांगलाच हिरमोड झाल्याची चर्चा रंगली होती.